“वर्तमानकाळातील स्त्री” मराठी निबंध marathi nibandh
बंदिवान मी या जन्मीची, नारी बनूनी जन्म भूवरी हा भूतकाळ असला तरी सत्यकाळ होता. खरचं स्त्री ही चाकोरीबद्ध जीवन जगत होती. पुरुषप्रधान संस्कृतीचे सगळे नियम तिने पाळले. समाजाने तिच्यावर बोट उचलले ना! सीता मातेसही अग्निपरीक्षा दयावी लागली. द्रौपदीलाही दुःशासनाने भरसभेत अपमानित केले. पूर्वीपासून आतापर्यंतच्या स्त्रिया धोरणव्यवहारी, मुत्सद्दी, अष्टपैलू, व्यक्तिमत्त्व जपणाऱ्याच होत्या. पूर्वीच्या काळी त्यांची मुस्कटदाबी होई. त्यांच्यात गुणांची खाण नव्हती का? त्यांना भावभावना नव्हत्या का? परंतु कोणत्याही गुणांना प्रोत्साहन मिळावे लागते. तरच ते गुण उभारी घेतात. जिजाऊंसारखी धोरणी माता, झाशीच्या राणी स्वाभिमानी राजकारणी होत्याच, तर सर्वसामान्य स्त्रियांना पुढे आणण्यासाठी सावत्रीबाई फुले पुढे आल्या. त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले व सर्वांना पवित्र ज्ञानदानाचे कार्य केले.
एकीकडे राजघराण्यातील मोठमोठ्या स्त्रिया होत्या. ज्यांना मोठेपणाच्या नावाखाली सर्वांपुढे येण्यास राजमान्यता नव्हती. पण तरीही प्रत्येक कसरत कौशल्याने पार पाडणे, हे स्त्रियांना जणू जन्मापासूनच माहीत असते. जिने आदिमायेच्या स्वार्थाने आपल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याची प्रेरणा दिली. त्यांनी स्वतःच्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण देशाचे हित साधले. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात बरीच उदाहरणे पाहायला मिळतात. स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कधी आपले राज्य परकीयांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. कालच्या स्त्रियांमध्ये सर्व गुण होते पण ते व्यक्त करण्याची योग्य दिशा नव्हती. आजच्या युगाची प्रगती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, कलेच्या क्षेत्रात नटराजाची मूर्ती तू अवकाशातील उत्तुंग भरारी तू, खरंच साऱ्यांच्या यशाची कीर्ती तू, शास्त्रज्ञ, वैदय, वकील बनलीस तू, सोडिले न एकही क्षेत्र, अंतराळही तू पार केलेस, अशी वर्तमानातील, सशक्त नारी तू ! आज ती खंबीरपणे नेतृत्व करते. तिच्या पुढील आव्हाने बदलली. त्याचप्रमाणे तिची प्रयत्नांची पराकाष्ठा व चिकाटी पण अवर्णनीय आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सानिया मिर्झा, कल्पना चावला, इंदिरा गांधी, सुनिता विल्यम्स या सर्वांनी प्रगतीची दारे फक्त स्त्रियांसाठीच म्हणून नाही, तर देशासाठी कीर्तीची, नावलौकीकाची खुली केली. आजच्या स्त्रियांपुढे आव्हानांची वेगळीच मालिका आहे. घरची जबाबदारी संभाळून खांदयाला खांदा लावून ती सर्व क्षेत्र पादाक्रांत करते आहे. आजच्या आधुनिक काळात स्त्रिया पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसतात. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही.
पूर्वीच्या काळी नोकरी करणारी स्त्री म्हणजे सहसा शैक्षणिक क्षेत्रात म्हणजेच शिक्षिका असलेली आता परिस्थिती बरीच बदलली आहे. अगदी चालक-वाहक महिला ते ‘नासा’मध्ये शास्त्रज्ञ महिला आहेत. अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला दिसतात. सध्या चर्चेत असलेल्या क्रीडा क्षेत्रात पी. व्ही. सिंधू, पैलवान गीता आणि बबिता फोगट अशा अनेक स्त्रियांकडून प्रेरित होऊन तरुणी आता अनेक नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करताना दिसत आहेत. राज्यघटना लागू झाल्यापासून आजपर्यंत स्त्री जीवनात सकारात्मक बदल झाले. स्वयंसिद्ध, स्वायत्त, स्वतंत्र होण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. आपण कमी आहोत, ही जाणीव त्या पुसून टाकत आहेत.
संविधान समतेचा जागर साधते. जातिभेद, स्तरभेद, वर्गभेद, लिंगभेद अशा सर्व भेदांना ती निराकरणाची भूमिका मांडते. राज्यातील दुय्यम घटक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महिलांना सबल करण्यासाठी आपले स्वतंत्र्य राज्य कटिबद्ध आहे. देशापुढील अनेक समस्यांचा परिहार एका मार्गामुळे शक्य होण्याची खात्री होती, आणि तो मार्ग म्हणजे स्त्री जीवनात योग्य असा बदल घडवून आणणे, एखादा देश प्रगत आहे की नाही, हे मोजताना-जोखताना त्या देशातील स्त्री जीवनाचा विचार प्रामुख्याने केला जातो.
त्या देशातील स्त्री किती प्रमाणात सक्षम आहे, हे पाहिले जाते. आजच्या घडीला देशातील स्त्री जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला काय दिसते ? तर दोन प्रकारांतील महिला दिसतात. प्रस्थापित पुरुषप्रधान म्हणून सांगितल्या जाणाऱ्या पारंपरिक मानसिकतेतृत आपला पद्धतशीर, सोयीस्कर विदथेचा परिसस्पर्श घडवून त्यातून विकास साधणाऱ्या अत्यल्प महिला. गेल्या ६०-७० च्या दशकातील कालावधीत महिलांमध्ये स्वतंत्र भारताच्या वाटचालीने नक्कीच महत्त्वपूर्ण असे बदल घडवून आणलेले आहेत. जोतिबा फुले, महर्षी कर्वे, यांसारख्या समाजप्रेषितांनी स्त्री-शिक्षणाचे लावलेले रोपटे हळूहळू मजबूत अशा वृक्षात रूपांतरित होत आहे. तसा एखादा भारतासारख्या हजारो सामाजिक गुंतागुतींनी युक्त देश विकसित देश बनायला ६० वर्षांचा अवधी कुठे पुरणार? पण स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्री जीवनाची हालाखी (बालविवाह, सती, विधवा विवाह, अन्याय-अत्याचार, अन्याय रूढीग्रस्तता, रोगराई, परावलंबित्व पाहता त्या पार्श्वभूमीवर आज स्त्री-जीवनात पुष्कळच सुधारणा घडत आहेत, असे म्हणता येते. निदान सुधारित स्त्री जीवन, आवृत्ती म्हणजे काय? आजची स्त्री स्वावलंबी बनली आहे. आज स्वातंत्र्य आहे; पण स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ जबाबदारी उचलण्यासाठी, सक्षम असणे असा होतो. केवळ स्वार्थ साधणे, असा होत नाही. या जबाबदारीत आत्मनिर्भरता शिवाय मानवी मूलभूत जीवनसंस्कृती, मूल्यांची निगा, राखून ती सर्वच गोष्टींची सांगड घालून आजची स्त्री-जीवन जगत आहे. बदल हे एक शाश्वत सत्य आहे. काळ बदलतो तसे मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध होत जाते. अनेक ठिकाणी आजही स्त्रीला समाजाचा एक दुय्यम घटक म्हणून मानले जाते. तिच्यामधील क्षमतांवर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक जण आहेत. आकाशाला गवसणी घालून येणाऱ्या कल्पना चावला यांच्यासारख्या धाडसी कन्या, समाजाच्या हिंसाचाराला झिडकारून मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणा बनणाऱ्या मलाला युसुफजई असल्या तरी समाजाच्या गलिच्छ नजरेपासून स्वतःला वाचवू पाहणाऱ्या कितीतरी निर्भयादेखील आहेत. महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. विविध सामाजिक संस्था महिलांसाठी धावून येत आहेत. त्या निरागस कळ्यांचे काय? ज्यांना ती स्त्री आहे या गोष्टीची जाणीव होण्याच्या आतच खुडले नाही तर उखडले जाते.
अशा महिलांसाठी व महिला सुरक्षेसाठी शासनाने अनेक कायदेही केलेले आहेत. पण त्याची योग्य वेळेला अंमलबजावणी होणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कायदयाची जरब राहिलेली नाही आणि त्यामुळे सर्वत्र असुरक्षितेची भावना वाढीस लागत आहे. केवळ मुलगी आहे, या एका गोष्टीमुळे ती घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत घरच्यांना काळजी लागलेली असते. अशा सततच्या असुरक्षित वातावरणामुळे आजची झेप घेत असलेली मुलगी कुठेतरी डगमगत आहे. तिच्या स्वतःमधली आत्मनिर्भरता ती विसरू लागली आहे. ‘मुलींना शिकू दया’ च्या आधी आपल्या मुलींना सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे आणि या सगळ्या पलीकडे जाऊन खरे तर स्त्रियांनी देखील स्वतःची मानसिकता खंबीर करणे गरजेचे आहे. कारण अत्याचार करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा, त्याला खतपाणी घालणाराच कुठे तरी जबाबदार असतो. कारण रक्षकच भक्षक झाल्याची उदाहरणे देखील कमी नाहीत. त्यामुळे गरज आहे ती स्वतः स्वसंरक्षणासाठी सिद्ध होण्याची. पडद्याआड राहून झोपी गेलेल्या सिंहिणीला जागृत करण्याची, आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांचे स्वतः रणरागिणी होऊन सडेतोड उत्तर देण्याची, स्वतःचे रक्षण करण्यास बालपणापासूनच तिला शिकवले आणि ती एक मनुष्य आहे, तिच्याकडे बघण्याची ‘निर्मळ नजर’ समाजाला शिकवणे ही बदलत्या काळाची गरज आहे. बालपणी ‘स’ संसाराचा शिकवण्यापूर्वी तिला ‘स’ सक्षमतेचा शिकवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा स्त्री स्वतः सक्षम होईल, आणि खंबीरपणे उत्तर दयायला शिकेल तेव्हाच तिच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना जरब बसेल. तिने टाकलेला एक कटाक्षच तिच्या संरक्षणाची ढाल बनून तिचे रक्षण करेल, यात तिळमात्र शंका नाही.
मराठी निबंध Marathi Nibandh
| अणु.क्र | निबंधाचे नाव | pdf download |
| 1 | ग्रंथ हेच गुरु | क्लिक करा |
| 2 | मोबाईल शाप की वरदान | क्लिक करा |
| 3 | मराठी असे आमची मायबोली | क्लिक करा |
| 4 | अपयशी हीच यशाची पहिली पायरी | क्लिक करा |
| 5 | नेमबाज मनू भाकर | क्लिक करा |
| 6 | आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज | क्लिक करा |
| 7 | covid-19 : एक संकट की संधी | क्लिक करा |
| 8 | भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू | क्लिक करा |
| 9 | भारताची अवकाशीय उत्तुंग झेप | क्लिक करा |
| 10 | वर्तमान काळातील स्त्री | क्लिक करा |
| 11 | क्लिक करा | |
| 12 | क्लिक करा | |








