“संयमाचे जीवनातील महत्त्व” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“संयमाचे जीवनातील महत्त्व” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

एक मूर्तिकार मुर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. तो ज्याचा पुतळा व मुर्ती करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई.

एकदा त्याने खुर्चीत बसलेला व हातात काठी घेतलेला रखवालदाराचा पुतळा तयार केला. खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर व दरोडेखोरांचा समज होऊन तेत्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत. नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते.

आता आता त्याने शंभरी गाठली. यमदुताला हुलकावणी देण्यासाठी त्याने आपल्यासारखे हुबेहूब दहा पुतळे तयार केले. एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली, तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळ्यात दहावा पुतळा म्हणून निश्‍चलपणे बसून राहिला.

यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा पुतळे. कुणाला घेऊन जावे ? हा त्यांच्यापुढे पेच पडला तेवढ्यात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्‍यांना मुद्दाम म्हणाला, बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे ? कारण खर्‍या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळ्यात दाखवायचे राहून गेले आहे.

त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष मी या माझ्या पुतळ्यात दाखविलेला नाही ?

यावर तो चतुर यमदूत म्हणाला, हे चित्रकारा, तुझ्यात आणि या तुझ्या पुतळ्यात काही एक फरक नाही, पण तुझ्याप्रमाणे बोलत नाहीत.

तात्पर्य : संयम ठेवला तर सर्व कामे सिद्धीस जातात.

Leave a Comment