नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) साठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत pat exam circular 

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) साठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत pat exam circular 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२६/प्र.क्र.१५३/एसडी-६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय, मुंबई ० ४००३२

दिनांक:- १९ ऑक्टोंबर, २०२६

संदर्भ :

१) शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.५३/एसडी-६, दिनांक २६.०९.२०२५.

२) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.०९.०४.२०२६

३) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन / PAT/निधी/२०२५-२६, दि.०१.१०.२०२६

प्रस्तावना -:

राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (STARS ) या केंद्रपुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नियतकालिक चाचण्यांचे आयोजन (Periodic Assessment Test PAT) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत करण्यात येत आहे. यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित चाचणी-१ व संकलित चाचणी-२ या चाचण्या घेण्यात येतात. सदर चाचण्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण (Learning Outcomes) तसेच क्षमता आधारित मूल्यमापन (Competency Based Assessment) यांच्या अनुषंगाने विकसित करण्यात आलेल्या असून, राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे नियमित परीक्षण करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

२. सन २०२६-२७ मध्ये इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार संकलित मूल्यमापन १ (PAT-२) दि.२६ ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घेण्याचे प्रस्तावित आहे. सदर चाचण्यांचे आयोजन करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -:

सन २०२६-२७ मध्ये इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित चाचणी १-(PAT-२) चे आयोजन करण्यासाठी रु. ५.८३३५ कोटी (अक्षरी रुपये पाच कोटी त्र्याऐंशी लाख पस्तीस हजार फक्त) इतका निधी खालील नमूद अटींच्या अधीन राहून उपलब्ध करुन देण्यात येत आहे :-

१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी केंद्र शासनाकडे प्रभावीपणे मागणी करून जास्तीत जास्त निधी प्राप्त करून घेण्याकरिता परिणामकारक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२. ज्या कारणासाठी निधी मागणी केली आहे, त्याच कारणासाठी खर्च होत असल्याची खातरजमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांची राहील.

३. प्रस्तावित निधी वितरीत करताना विहीत कार्यपद्धतीचे अनुपालन करण्याची दक्षता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी घ्यावी.

४. सदर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांची राहील.

२. सदर बाबीवरील खर्च “मागणी क्र. ई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, ०५२, उपकरणे (००) (००) (०१) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (कार्यक्रम) (२२०२एल०६६) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर)” या लेखाशिर्षाखाली सन २०२६-२७ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याबाबत या योजनेसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “नियंत्रक अधिकारी” आणि लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणुन घोषित करण्यात आले आहे. संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरचा निधी कोषागारातून आहरीत करुन संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना अंमलबजावणीसाठी वर्ग करण्यात यावा. संदर्भ क्र. २ येथील वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दि.०९.०४.२०२६ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता करण्यात यावी.

४. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र. ७०५/व्यय-५, दि.१५.१०.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६१०१९१३२५२९७७४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

प्रत-:

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment