“महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५” उमेदवारांकरीता ठळक सूचना rajpatrit sanyukta purva pariksha
(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
(२) प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशाकरिता दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये सुधारित प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सदर परीक्षेसाठी यापूर्वी उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जुन्या प्रवेश प्रमाणपत्राआधारे परीक्षा उपकेंद्रावर कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही.
(३) उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” काळजीपूर्वक अवलोकन करावे.
(४) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.
(५) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
(६) परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही.
(७) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.
(८) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
(९) पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.
(१०) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
(११) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
(१२) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
(१३) कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!











