विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ SIR- Special Intensive Revision
संदर्भ :
१) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक- २३/२०२५-ERS (Vol-II), दिनांक १४.०५.२०२६.
२) भारत निवडणूक आयोगाचे क्रमांक- ईसीआय/पीएन/१२०/२०२६,
दिनांक २६.०९.२०२६ चे प्रसिध्दी पत्रक.
महोदय/महोदया,
भारत निवडणूक आयोगाने दिनांक २६.०९.२०२६ रोजी प्रसिध्द पत्रक (Press Note) निर्गमित केले आहे. सदर प्रसिध्दी पत्रकाद्वारे विशेष सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे :-
१) मतदार याद्यांच्या सध्या सुरु असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR- Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान ज्या व्यक्तींना जुळवणी न झालेले मतदार (Unmapped) किंवा तार्कीक विसंगती (Logical Discrepancies) या कारणास्तव नोटीस बजावण्यात आली आहे, अशा व्यक्तींच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः जाऊन आवश्यक दस्तऐवज संकलित करतील. त्यानंतर हे दस्तऐवज मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (ERO) निर्णयासाठी ECINet या -पोर्टलवर अपलोड केले जातील. अशा मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (AERO) कार्यालयात बोलविण्याची आवश्यकता असणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच, मतदार नोंदणी अधिकाऱ्याने तसा निर्णय घेतल्यास, प्राधान्याने ऑनलाईन पध्दतीने सुनावणी घेतली जाईल. आवश्यकता भासल्यास मतदाराच्या वतीने सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला परवानगी दिली जाऊ शकते.
२) जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) गरजेनुसार रात्र निवाऱ्यांमध्ये राहणारे नागरिक, मजूर, गरीब आणि बेघर लोकांसाठी पुरेशा संख्येने मदत कक्ष सुरू करतील किंवा विशेष शिबिरांचे आयोजन करतील.
३) महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या विनंतीनुसार, महाराष्ट्रात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत आयोगाने दिनांक १२ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत वाढवली आहे. महाराष्ट्रात नोटिसा तसेच दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत दिनांक १० नोव्हेंबर, २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
२. भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्द पत्रकात नमूद केलेल्या वरील बाबी निवडणूक यंत्रणेमार्फत, सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात. तसेच, वरील बाबींचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.
३. या कार्यालयाच्या दिनांक १६.०९.२०२६ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सर्व सूचना तशाच लागू राहतील.










