व्यक्ति विशेष “सुरेंद्रनाथ बॅनर्जी” vyakti vishesh
थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक. जन्म कलकत्ता येथे. वडील दुर्गाचरण डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी. ए. झाल्यानतंर (१८६८) इंग्लंडला जाऊन ते आय्. सी. एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६९). भारतात परतल्यावर त्यांची साहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेटला नियुक्ती झाली पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून काढले (१८७४). त्या विरुद्ध त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही परवानगी नाकारण्यात आली.
कलकत्त्यातील मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये (विद्यमान विद्यासागर महाविद्यालय) ते सुरुवातीस इंग्रजी विषयाचे अध्यापक होते. नंतर काही दिवस ते फ्री चर्च कॉलेजमध्ये होते. पुढे त्यांनी रिपन महाविद्यालय (विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय) स्थापन केले. तेथेच अध्यापक म्हणून त्यांनी सु. ३७ वर्षे घालविली तथापि राजकारणापासून ते अलिप्त नव्हते. जनजागृतीसाठी त्यांनी बेंगॉली हे इंग्रजी वृत्तपत्र काढले (१८७८). त्यातून त्यांनी सु. ५० वर्षे सातत्याने लेखन केले. शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषतः ब्राह्योसमाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला, की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले.









