क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ? क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार व उदाहरणे types of adverb examples

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ? क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार व उदाहरणे types of adverb examples

क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार

क्रियाविशेषण अव्ययांचे मुख्य प्रकार चार आहेत

(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय.

(२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय.

(३) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय.

(४) संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय.

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

(१) मी दररोज अभ्यास करतो.

(२) उद्या आपण सहलीला जाऊ,

वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द ‘दररोज’ व ‘ उद्या’ ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. ही क्रियाविशेषण अव्यये क्रियापदांच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी विशेष माहिती देतात.

जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी विशेष माहिती देते, त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून, ‘दररोज’ व ‘उद्या’ ही कालवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत,

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांची यादी आज, काल, आजकाल, अद्याप दिवसभर, उदया, परवा,

दररोज, नेहमी, सतत, पुनः पुन्हा, वारंवार, एकदा, सदा, सर्वदा, क्षणोक्षणी, वेळोवेळी, हल्ली, यंदा, पूर्वी, आता, मागे, सकाळी, संध्याकाळी, रात्री, जेव्हा, तेव्हा, केव्हा, आधी, सध्या, तूर्त इत्यादी.

वाक्यांत उपयोग :

(१) काल शाळेला सुट्टी होती.

(२) हल्ली संगणकाशिवाय चालत नाही.

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

(१) देव सर्वत्र आहे.

(२) घरापासून माझी शाळा जवळ आहे.

वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द ‘सर्वत्र’ व ‘जवळ’ ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. ही क्रियाविशेषण अव्यये क्रियापदांच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देतात,

जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देते, त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून, ‘सर्वत्र’ व ‘जवळ’ ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत.

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांची यादी येथे, तेथे, इकडे, तिकडे, चोहीकडे, अलीकडे, पलीकडे, आत, बाहेर, खाली, वर, बाजूला, जवळ, दूर, दुरून, लांब, मध्ये, सभोवती, सर्वत्र, सभोवार, पुदून, मागून, समोरून इत्यादी.

वाक्यांत उपयोग:

(१) वही खाली पडली, ती वर ठेव.

(२) नदीच्या पलीकडे झाड आहे.

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

(१) सरिता हळूहळू बोलते.

(२) फांदीवरून कावळा पटकन उडाला.

वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द ‘हळूहळू’‘पटकन’ ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. ही क्रियाविशेषण अव्यये क्रियापदाची रीत किया पद्यत यांविषयी विशेष माहिती देतात.

जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या रीतीविषयी किंवा पद्धतीविषयी विशेष माहिती देते, त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून, ‘हळूहळू व ‘पटकन’ ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत.

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांची यादी असे, तसे, कसे, जसे, कसेबसे, आपोआप, मुद्दाम, हळूहळू, सावकाश, जलद, जोरात, उगीच व्यर्थ, तुरुतुरु, पटकन, झटकन, भुर्रकन, पटापट, गटागटा, धपकन, बदाबदा, खरोखर, चमचम, खचित, दुःखाने, आनंदाने, थेंबे थेबे, फुकट, ऐटीत, एकटक इत्यादी.

वाक्यांत उपयोग :

(१) पावसात जलद चालू नकोस, सावकाश चाल.

(२) राजू गटागटा पाणी पितो.

संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

(१) या वाचनालयात मी खूपदा येतो.

(२) मी त्याला ही गोष्ट चारदा सांगितली.

वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द ‘खूपदा’‘चारदा’ ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. ही क्रियाविशेषण अव्यये क्रियापदांच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देतात.

जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देते, त्याला संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात; म्हणून, ‘खूपदा’ व ‘चारदा’ ही संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत.

संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांची यादी भरपूर, पुष्कळ, अनेकदा, एकदा, दोनदा, चारदा, किंचित, जरा, थोडा, काहीसा, पुरेसा, क्वचित, अगदी, फार, अत्यंत, बिलकूल, अजिबात, अतिशय, मुळीच, मोजके, बहुत, अर्धा, पूर्ण, चतकोर, वाजवी, बेताचे इत्यादी.

वाक्यांत उपयोग :

(१) रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले.

(२) तोंडातून अजिबात शब्द काढू नकोस.

Related posts:

Leave a Comment