राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत स्पष्टीकरण anukampa niyukti sudharit yojana
वाचा: १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. अकंपा २०२५/प्र. क्र. ८२९/टीएनटी-१, दि. २७.०१.२०२६
२) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.
शिसंयो/२०२६/ अनुकंपा/खाप्रशा/आस्था-का३/०२४९३, दि. ०६.०५.२०२६.
शासन परिपत्रकः
राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे. तथापि, सुधारित धोरणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरील प्रस्तावासंदर्भात कार्यवाही करताना क्षेत्रिय स्तरावर संभ्रमाची परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे.
शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी संदर्भ क्र. २ येथील दि. ०६.०५.२०२६ रोजीच्या पत्रान्वये काही मुद्दयांबाबत शासनाकडून मार्गदर्शन अपेक्षिले आहे. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी दि.२०.०५.२०२६ रोजी व्ही.सी. द्वारे चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे यथास्थिती निरसन करण्यात आले आहे. सदर चर्चेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व अन्य काही अनुषंगिक मुद्दे विचारात घेऊन अनुकंपा नियुक्ती धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे आवश्यक असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.
२. संभ्रमाची परिस्थिती असलेले मुद्दे व त्याबाबतचे स्पष्टीकरण याचा तपशिल
अनुकंपा नियुक्ती धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
३.१ सनियंत्रण व समन्वयः
१) अनुकंपा नियुक्तीबाबत सुधारित धोरणाप्रमाणे विहित कालावधीत कार्यवाही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) व संचालक (योजना) यांच्यावर राहील.
२) सदर कार्यवाही करिता आयुक्त (शिक्षण) यांनी त्यांच्या कार्यालयात व संचालक (योजना) यांनी त्यांच्या कार्यालयात एका अधिकाऱ्यास समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात यावी. या समन्वय अधिकाऱ्यांकडे अनुकंपा भरतीबाबत समन्वय व माहितीचे आदान-प्रदान व माहितीचे अद्यावतीकरण याबाबतची संपूर्ण जबाबदारी राहील.
३) कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर एक महिन्याच्या आत अनुकंपा योजनेची माहिती कुटुंबास देणे संस्थेस बंधनकारक राहील.
३.२ सक्षम प्राधिकारी यांची जबाबदारीः
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, दिनांक २७.०१.२०२६ मधील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी (योजना) यांनी पात्र अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करणे, पात्र उमेदवारांची शैक्षणिक संस्थेला नियुक्ती करिता शिफारस करणे व सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेली अनुषंगिक कार्यवाही करणे अभिप्रेत आहे. शिक्षणाधिकारी (योजना) यांनी ज्या पात्र अनुकंपा उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही असे उमेदवार व नवीन पात्र अनुकंपा उमेदवार यांच्या प्रतीक्षा याद्या तयार कराव्यात व पात्रता यादीतील जेष्ठता क्रमानुसार या पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याकरिता संबंधित शैक्षणिक संस्थेला शिफारस करावी. तथापि, शिक्षणाधिकारी (योजना) यांनी कोणत्याही परिस्थितीत अनुकंपा प्रस्तावाच्या अनुषंगाने नियुक्तीस मान्यता देण्याबाबत किंवा नाकारण्याबाबत आदेश निर्गमित करु नयेत.
२) नियुक्ती प्राधिकारी असलेल्या शैक्षणिक संस्थांनी अनुकंपा उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्या उमेदवारांची विहित कार्यपद्धतीनुसार त्यांच्या संस्थेत नियुक्ती केली असल्यास अशा उमेदवारांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व (माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक अशा संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी.
३) या सुधारित धोरणापूर्वी प्रचलित असलेल्या अनुकंपा धोरणानुसार शैक्षणिक संस्थेने नियुक्ती दिलेल्या पात्र उमेदवारांचे प्रस्ताव शिक्षण अधिकारी (योजना) यांच्याकडे वर्ग केले असल्यास, असे प्रस्ताव शिक्षण अधिकारी (योजना) यांनी तात्काळ वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी याबाबतच्या पुढील कार्यवाही करिता संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वर्ग करावेत.
४) पात्र अनुकंपा उमेदवारांची शैक्षणिक संस्थेला शिफारस करण्यासाठी रिक्त पदांची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शिक्षणाधिकारी (योजना) यांना विनाविलंब उपलब्ध करून द्यावी.
५) यासाठी शिक्षणाधिकारी (योजना) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संयुक्त स्वाक्षरीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्थांकडून अद्ययावत रिक्त पदांची माहिती मागवावी व संस्थेला सदर माहिती ७ दिवसात उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
६) शिक्षणाधिकारी (योजना) यांनी त्यांच्याकडे प्राप्त अनुकंपा नियुक्तीचे प्रस्ताव गुणवत्तेप्रमाणे तपासून परिपूर्ण प्रस्तावाच्या बाबतीत जास्तीत जास्त १ महिन्यात नियुक्ती प्राधिकाऱ्यास (शैक्षणिक संस्थेस) शिफारस करणे बंधनकारक राहील. तथापि, उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार प्राधान्याने त्याच्या राहत्या पत्त्याजवळ अनुकंपा नेमणूकीसाठी विचार करण्यात यावा.
७) ज्यांचे प्रस्ताव परिपूर्ण नाहीत किंवा ज्यांचे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून सादर केले गेले नाहीत अशाप्रकारचा पत्रव्यवहार करणाऱ्या अनुकंपा धारकांचे परिपूर्ण प्रस्ताव संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून शिक्षणाधिकारी (योजना) यांनी १५ दिवसात प्राप्त करून घेऊन वरीलप्रमाणे कार्यवाही करणे बंधनकारक राहील.
८) शिक्षणाधिकारी (योजना) यांनी अनुकंपा उमेदवाराची शिफारस केल्यानंतर १५ दिवसात सदर संस्थेने अशा पात्र उमेदवारांची नियुक्ती करून सदर उमेदवाराच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव प्रचलित कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावा.
९) शैक्षणिक संस्थेने पात्र अनुकंपा उमेदवाराची नियुक्ती करून वैयक्तिक मान्यतेस्तव सक्षम प्राधिकाऱ्यास प्रस्ताव विहित वेळेत सादर न केल्यास संस्थेला त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देऊन ते पद व्यपगत करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) यांनी प्रकरणपरत्वे तशी शिफारस सक्षम प्राधिकाऱ्यास १ महिन्यात करणे बंधनकारक राहील. शैक्षणिक संस्थेने अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव न स्वीकारल्यास अथवा पात्र अनुकंपाधारकास नियुक्ती न दिल्यास सदर पद त्याच व्यक्तीला अनुकंपा नियुक्ती देण्याच्या अटीवर पुनर्जीवित करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
१०) प्रस्तुत विषयाबाबत सक्षम प्राधिकारी यांनी संबंधितांना सुनावणीची संधी देऊन संबंधित संस्थेचे पद व्यपगत करण्याच्या अनुषंगाने प्रचलित नियम व कार्यपध्दतीनुसार १ महिन्याच्या कालावधीत कार्यवाही न केल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
११) शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीच्या आधारे सुरू असलेल्या भरती प्रक्रीयेसाठी पवित्र प्रणालीवर रिक्त जागांची मागणी नोंदविण्यापुर्वी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त जागावर पात्र अनुकंपा धारक दोन्ही प्रतीक्षा यादी मध्ये उपलब्ध नसल्याची खातरजमा संबंधित
शिक्षणाधिकारी (योजना) यांनी केली असल्याचे व तसेच ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे तपासावे व त्यानंतरच पवित्र प्रणालीवर रिक्त पदाची नोंदणी करावी. भरतीपूर्वी रिक्त पदांवर पात्र अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी.
१२) अशा प्रकारे शिफारशीनंतरही नियुक्ती न मिळालेल्या अनुकंपाधारकाची पुनश्च शिफारस करण्यासंदर्भात सुधारित अनुकंपा धोरणातील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी (योजना) यांनी यथोचित कार्यवाही करावी.
१३) सुधारित अनुकंपा धोरणातंर्गत येणाऱ्या मृत शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वारसाला शिफारसीनंतरही अनुकंपा नियुक्ती मिळाली नाही अशा अनुकंपाधारकांची परिपूर्ण यादी शिक्षणाधिकारी (योजना) यांनी त्यांच्या कार्यालयात ठेवावी व ती दर महिन्याला अद्यावत करण्यात यावी.
१४) विहित तरतूदीनुसार केलेल्या शिफारशीस अनुसरुन संस्थेने दिलेल्या नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचे प्राप्त प्रस्ताव गुणवत्तेनुसार तपासून संबंधित शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी १५ दिवसात निकाली काढणे बंधनकारक राहील, अन्यथा संबंधितांवर आयुक्त (शिक्षण) यांनी नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करावी.
१५) वैयक्तिक मान्यता दिलेले अनुकंपा नियुक्तीचे प्रस्ताव शालार्थ आयडी मिळण्यासाठी १५ दिवसात संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करणे व असे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शालार्थ आयडी देण्याबाबत पुढील उचित कार्यवाही १ महिन्यात करावी.
१६) उमेदवाराचा अनुकंपाचा प्रस्ताव पूर्णपणे अमान्य केल्यानंतर संबंधित उमेदवारास त्याचे तोंडी म्हणणे ऐकण्याची वाजवी संधी देण्यासाठी ज्या स्तरावर प्रस्ताव अमान्य झाला असेल त्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या एकस्तर वर सुनावणीची संधी उपलब्ध करून द्यावी.
१७) प्रस्तुत प्रकरणी ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत सदर प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने यथाशिघ्र पार पाडण्यात यावी. ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर त्यात काही तांत्रिक अडचणी आली या कारणास्तव अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही बंद ठेवता येणार नाही. अशा वेळी ऑफलाईन पध्दतीने कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात यावी.
१८) सुधारित शासन धोरणानुसार पात्रता नसलेल्या उमेदवारांबाबत आवश्यकता असल्यास मानवतेच्या दृष्टिकोनातून काही अटी शिथिल करावयाच्या असल्यास तसा प्रस्ताव शिफारशीसह शासनास मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक राहील.
३.३ अनुकंपा नियुक्ती व अनुषंगिक कार्यवाही करिता ऑनलाईन प्रणाली विकसित करणेः
१) शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्थ खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसंदर्भात अनुकंपा नियुक्ती
बाबतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात यावी. ही जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांची असेल.
२) याकरिता आयुक्त (शिक्षण) यांनी त्यांच्या वेबसाईट / पोर्टलवर अनुकंपा नियुक्ती भरती बाबत कायमस्वरूपी एक टॅब उपलब्ध करून द्यावा. सदर टॅबवर अनुकंपा उमेदवारांची त्यांच्या तालुक्यातील सर्व माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यातील उप शिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावी. हे सर्व काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी यांची असेल. तर विभागीय शिक्षण उपसंचालक हे नियंत्रक अधिकारी असतील.
३) अनुकंपा भरती बाबत उमेदवारांच्या ऑनलाईन माहितीमध्ये सोबतच्या प्रपत्राच्या नमुन्याप्रमाणे माहिती ऑनलाईन उपलब्ध असणे आवश्यक राहील. आवश्यकतेनुसार यामध्ये अतिरिक्त माहितीचा समावेश करण्यात यावा.
४) त्यामुळे शासन व आयुक्त (शिक्षण) यांच्या स्तरावर राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील एकूण उमेदवारांची संख्या, त्यापैकी नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांची संख्या, संस्थेने हजर करून घेतलेल्या उमेदवारांची संख्या व प्रलंबित उमेदवारांची संख्या इत्यादी माहिती उपलब्ध होऊ शकेल.
५) ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होईपर्यंत, अनुकंपा उमेदवारांची वरील प्रमाणे ऑफलाईन एकत्रित माहिती संचालक माध्यमिक व संचालक प्राथमिक यांनी विभागीय उपसंचालक यांच्यामार्फत आयुक्त शिक्षण / शासन यांना उपलब्ध करून द्यावी.
६) प्रस्तुत प्रकरणी आवश्यकतेनुसार ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनुषंगिक बदल आयुक्त (शिक्षण) यांच्या स्तरावर करण्यात यावेत.
३.४ अभियानः
१) पात्र अनुकंपा उमेदवारांच्या भरती संदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी एक अभियान सुरू करावे. या अभियानाअंतर्गत या संदर्भात एक कालबद्ध कार्यक्रम नियोजित करावा. या अभियानांतर्गत जास्तीत जास्त पात्र अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात अनुषंगिक कार्यवाही विहित वेळेत करण्याची दक्षता घ्यावी.
२) शैक्षणिक संस्थेने नियुक्ती दिलेल्या पात्र उमेदवारांच्या प्रलंबित परिपूर्ण प्रस्तावास संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) १ महिन्यात वैयक्तिक मान्यता देण्याची कार्यवाही पूर्ण करून विहित वेळेत शालार्थ आयडी प्रस्ताव सादर करणे व त्यास मान्यता देण्याची पुढील कार्यवाही सुरू करावी.
३) अनुकंपा भरतीच्या अभियान अंतर्गत १ महिन्यात अनुकंपा उमेदवारांची जेष्ठता यादी तयार करून त्यानुसार संस्थांनी नियुक्ती देऊन मान्यतेसाठी सादर केलेले अनुकंपा नियुक्तीचे प्रलंबित प्रस्ताव १ महिन्याच्या कालावधीत निकाली काढावेत. तसेच याबाबतच्या कार्यवाहीचा स्वतंत्र अहवाल शासनास सादर करावा.
४) हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांच्याबरोबरच शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण
संचालक (योजना) तसेच संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व संबंधित शिक्षणाधिकारी यांची राहील.
३.५ अहवाल:
अनुकंपा भरती बाबत अभियान कालावधीतील परिपूर्ण अहवाल विहित नमुन्यात आयुक्त (शिक्षण) यांनी प्रत्येक शुक्रवारी सादर करावा. तसेच, अभियान संपल्यानंतर अनुकंपा भरतीबाबत महिन्याच्या शेवटच्या आठवडयातील शुक्रवारी परिपूर्ण अहवाल सोबत जोडलेल्या विहित प्रपत्रातील नमुन्यात शासनास सादर करावा. त्याकरिता संबंधित संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी देखील विहित प्रपत्रातील नमुन्यातील अहवाल आयुक्त (शिक्षण) ठरवतील त्यानुसार विहित वेळेत सादर करावेत.
३.६ विलंबास प्रतिबंधः
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार विहित कालावधीत निर्णय न घेतल्यास सदर अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित अधिकारी/कर्मचारी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहील.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०६०४१८३१५८६६२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,









