निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यानंतर निवृत्तीवेतनधारकांनी अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार कार्यालयास भरून द्यावयाचे शपथपत्र मुद्रांक पेपरऐवजी साध्या पेपरवर घेणेबाबत nivrutti vetan paripatrak
वाचा :
१. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/कोषा प्र.५, दिनांक-१२ डिसेंबर, २००७
२. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/कोषा प्र.५, दिनांक-०४ जुलै, २००८
३. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/कोषा प्र.५, दिनांक-१८ ऑगस्ट, २००८
४. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/भाग-१/कोषा प्र.५, दिनांक-१९ जून, २०१३
५. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: संकिर्ण-२०२१/प्र.क्र.५२/सेवा-३ दिनांक-२२.११.२०२१
६. महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक-१४.१०.२०२४
७. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे जा.क्र.का.५/मुद्रांक- २४/स.क्र.३०७/२०२४/८२२ दिनांक-३०.१०.२०२४
प्रस्तावना :
निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडलेले असल्यास उपरोक्त नमूद वाचा क्र.३ अन्वये त्यांच्याकडून रु.१००/-च्या जनरल स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेण्यात येत होते.
उपरोक्त नमूद वाचा क्र. ६ अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ट क्र. १ मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून रु. १०० ऐवजी रु.५०० मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच वाचा क्र. ७ अन्वये शासकीय कार्यालयांमध्ये दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा पत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असल्याचे नमूद केलेले आहे.
यास्तव निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय :
शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा पत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले असल्याने संदर्भ क्र. ४ वरील दिनांक १९ जून, २०१३ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे.
निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरुन अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये सादर करण्यास दि.०१ ऑगस्ट, २०२६ पासून मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०७१४११५५१८९६०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,











