प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रम

महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रम चालु असुन भारत निवडणूक आयोगाने सुधारित केलेल्या वेळापत्रकानुसार सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी दि.17.08.2026 या दिनांकापर्यंत गणना अर्ज भरुन गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे द्यावयाची आहेत. गणना अर्ज भरुन व त्यावर स्वाक्षरी करुन दिलेल्या मतदारांची नावे दिनांक 24.08.2026 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 17 व 18 नुसार कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा जास्त जागी आपले नाव मतदार यादीत नोंदविता येत नाही. सबब, ज्या मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी असतील अशा मतदारांनी त्यांच्या सध्याच्या ठिकाणचाच गणना अर्ज भरुन द्यावा. संबंधित मतदाराच्या दुसऱ्या ठिकाणच्या गणना अर्जावर Already Enrolled’ असे नमूद करण्यात येईल व त्या ठिकाणी त्याचे नाव समाविष्ट होणार नाही. या प्रारुप याद्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच भारत निवडणूक आयोग / मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील.

ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळुन येणार नाहीत किंवा जे नव मतदार असतील त्यांना दिनांक 24.08.2026 ते दि. 23.09.2026 या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडुन सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरुन हरकत घेऊ शकेल. मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी दिनांक 27.10.2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया (Continuous Updation) आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment