दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी “माहिती अधिकार दिन” साजरा करण्याबाबत right to information day celebration
संदर्भ :- १. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र, दि. २१.०९.२०२६
२. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय, दि. २० सप्टेंबर, २००८
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन पत्राची प्रत या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
२. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून राज्यातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा करण्यात यावा असे संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये कळविण्यात आले आहे. तसेच, माहिती अधिकार दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धा तसेच चर्चासत्रे, व्याख्यानमाला व अन्य उपक्रम आयोजित करण्याबाबत देखील संदर्भाधीन शासन निर्णय व पत्रान्वये निर्देश देण्यात आले आहेत.
३. संदर्भाधीन शासन निर्णय व पत्रातील निर्देशांच्या अनुषंगाने दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यासाठी उपरोक्त उपक्रमांचे आयोजन करण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत. सदर उपक्रमांच्या आयोजनासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कार्यालये व स्थानिक सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे व आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा संक्षिप्त अहवाल शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती.











