“कष्टाची कमाई” मराठी बोधकथा marathi bodhkatha
कष्टाची कमाई
एका नगरात दोन चोर राहत होते. रोज चोरी करून, ते त्याचे दोन हिस्से करत असत, एक हिस्सा त्या दोघांसाठी व एक हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले, परंतु भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही, दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत
भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वतःबाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाले, “तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे, यावर कधी विचार केला आहे का?”
चोर म्हणाले, “आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार; कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वतःकडे ठेवतो आणि दुसरा ईश्वरचरणी अर्पण करतो.”
तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला, “आज तुम्ही चोरी करू शकला नाहीत त्यामुळे निराश दिसत आहात. तेव्हा हा कोंबडा ठेवा. याचे ही दोन हिस्से करा. एक स्वतःसाठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.” दोघे चोर आश्चर्यचकित झाले. संतांच्या बोलण्याचा आशय लक्षात घेऊन ते म्हणाले, “महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.” दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.











1 thought on ““कष्टाची कमाई” मराठी बोधकथा marathi bodhkatha”