“वाईट संगतीचे परिणाम !” मराठी बोधकथा marathi bodhkatha
वाईट संगतीचे परिणाम !
एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्याने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.
एके दिवशी शेतकऱ्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाळ्यात अडकलेले पाहून शेतकरी खूश झाला. तो म्हणाला, “अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल.” एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला खूप आश्चर्य वाटले.
त्यांने काळजीपूर्वक पाहिले तर, त्या जाळ्यामध्ये कावळ्याबरोबर एक कबूतर ही अडकलेले त्याला दिसले.
शेतकरी कबुतराला म्हणाला, “तू कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस, त्याचा परिणाम तुला आता भोगावाच लागेल.” असे म्हणून, शेतकऱ्याने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. कुत्र्याने एका एकाची शिकार केली.









