“अपमान आणि उपकार” मराठी बोधकथा marathi bodhkatha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“अपमान आणि उपकार” मराठी बोधकथा marathi bodhkatha

अपमान आणि उपकार

एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात. रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रूपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते की, एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो, “आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याच्याशी मी मैत्री केली ज्याच्यावर मी जिवापाड प्रेम केले, त्याने मला आज मारले.” ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो; पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात.

पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, स्नान करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, “आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो; पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले.” हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि मग त्याला राहवत नाही. तो त्या मित्राला विचारतो की, “पहिल्यांदा मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचवले तर ते तू दगडावर कोरून लिहिले, हे असे का?” लिहिणारा मित्र म्हणाला, “जेव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लागेल तेव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे, कारण काही काळानंतर वाळूत विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कोणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून ठेवावे. कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते, तसे उपकारही कायम लक्षात ठेवले पाहिजेत.

Leave a Comment