हेलन केलर यांची प्रेरणादायी गोष्ट helan kelar motivational stories
“सगळ्यात दयनीय व्यक्ती तो आहे, ज्याच्याकडे दृष्टी आहे पण जगण्यासाठीचा लागणारा दृष्टीकोन नाही.” हे वाक्य हेलन केलर यांचे आहे. यांचा जन्म अमेरिकेत २७ जून १८८० मध्ये झाला. त्यांची आई केट, वडिल अॅडम होते. हेलन केलर दोन वर्षांची असतांना आजारी पडल्या. त्या आजाराचे योग्य निदान न झाल्याने त्यांना आपली दृष्टी व श्रवण क्षमता गमवावी लागली. दिसणे व ऐकणे बंद झाल्यामुळे बोलणे ही बंद झाले होते. या काळात त्यांनी स्पर्श, हातवारे यांतून संवाद साधला. पण ही भाषा सगळ्यांच्याच लक्षात येत नव्हती. घरातल्या बऱ्याच वस्तू हेलन यांच्याकडून पडायच्या, ज्यात त्यांना ही लागायचे, वस्तूंचे नुकसान व्हायचे. त्यामुळे सगळ्यांना त्यांचा राग यायचा. यामुळे हेलन यांचा स्वभाव चिडचिडेपणाचा झाला. हेलन चिडल्या की, त्यांची आई त्यांना केक खाऊ घालायची. १८८६ साली त्यांच्या आईच्या वाचनात एक बातमी आली. ती बातमी एका मूक-बधिर स्त्री च्या यशस्वी जीवन प्रवासाची होती. या बातमी विषयी त्यांनी हेलनचे वडिल व
डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. डॉक्टरांनी त्यांना एका व्यक्तीचे नाव सुचविले. ३ मार्च १८८७ या दिवशी हेलन पूर्ण सात वर्षाची झाली होती. तेव्हा हेलन व तिच्या नव्या शिक्षिका अॅन सूलीवन यांची भेट झाली. इथूनच त्यांची असामान्य प्रवासाची सुरुवात झाली.
हेलनच्या शिक्षिका अॅन सूलीवन या हेलन यांच्या हातावर स्वतःच्या बोटांनी काही स्पेलिंग लिहून संवाद साधायच्या. त्यांनी हेलन यांच्यासाठी एक बाहुली भेट म्हणून आणली. तेव्हा त्यांनी हेलन यांच्या हातावर D-O-L-L असा उल्लेख केला. हे सर्व हेलन यांना कळत नव्हते. तेव्हा हेलन निराश झाल्या. कारण हेलनला या सर्वांची सवयच नव्हती. त्यात त्या लहान असल्यामुळे लगेच चिडत असे. प्रत्येक वस्तू ही एका विशिष्ट शब्दांनी ओळखली जाते हेच हेलनला समजत नव्हते.
जेव्हा अॅन सूलीवन हेलनला MUG हा शब्द शिकवत होत्या, तेव्हा हेलनने रागाने MUG च तोडून टाकला. हा प्रकार वारंवार होऊ लागला. ज्या हेलनला ऐकायला, बोलायला आणि डोळ्यांनी पाहायला जमत नव्हते अशा व्यक्तीला प्रत्यक्षात शिकवणे ही कल्पनाच करणे कठीण आहे. पण अॅन सूलीवन यांनी आपले प्रयत्न करणे सोडले नाही. त्यांच्या या प्रयत्नामुळे हेलनने देखील सूलीवन यांच्या हाताच्या हालचालींचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्यांची प्रगती होऊ लागली. हेलन यांना समजले की तिच्या शिक्षिका तिच्या हाताच्या तळव्यावर करत असलेल्या हालचाली म्हणजे
W-A-T-E-R हे करतांना दुसऱ्या हातावर पाणी टाकून हे WATER चे स्पेलिंग असल्याचे सूचवले. तेव्हा हेलन यांनी पाहिल्यांदा WATER हा शब्द उच्चारला हा क्षण म्हणजे एक चमत्कारच होता.
आता हेलन स्पर्श करुन बोलायला शिकल्या. यानंतर दोघींनीही पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. हेलन यांच्या आयुष्यावर The Miracle Worker हा चित्रपट ही बनवण्यात आला आहे.
हेलन केलर या अमेरिकन लेखक, वकील, अपंगत्त्व अधिकार अधिवक्ता, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्याता म्हणून जगभर ओळखल्या जाऊ लागल्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मूक बधिर महिला होत्या. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी सूलीवन यांच्या सहकार्याने The Story of My Life हे पुस्तक लिहिले. याशिवाय अनेक पुस्तके त्यांनी लिहीली.
१९३६ साली सूलीवन या हे जग सोडून गेल्या. त्यानंतर १९६८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने हेलन केलर यांचे निधन झाले.