केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सुधारित मार्गदर्शिका shikshan parishad guidelines
शिक्षण परिषद – शिक्षकांसाठीची आधारव्यवस्था
प्राथमिक शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया आहे. या दृष्टीने शिक्षकांना मुलांच्या शैक्षणिक गरजांची नेमकी जाण असणे व त्यानुसार प्रत्येक मुलाच्या प्रगतीसाठी नियोजन करणे गरजेचे आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या शासन निर्णयानुसार गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण केंद्रस्थानी ठेवून ‘शिक्षण परिषद’ आयोजित करणे बंधनकारक आहे. ही परिषद समूह साधन केंद्र समन्वयकांच्या नेतृत्त्वाखाली दरमहा केंद्रपातळीवर होणे आवश्यक आहे. शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील इतर शिक्षक राबवत असलेले विविध उपक्रम, अध्ययन अनुभव समजून घेणे, अनुभवांचे आदानप्रदान करणे, एकत्र येऊन आपल्याला जाणवणाऱ्या समस्या सोडवणे, पुढील महिन्यासाठीच्या अध्ययन निष्पत्ती ठरवणे, क्षमता आधारित नियोजन करणे, केंद्र संसाधन गटाचे मार्गदर्शन यातून शिक्षकांची क्षमता बांधणी होते. अशा रीतीने शिक्षकांना सक्षम होता यावे यासाठी शिक्षण परिषद एका आधारव्यवस्थेचे काम करते.
पुढील महिन्याचे नियोजन ही शिक्षण परिषदेमधील अत्यंत महत्त्वाची कृती आहे. क्षमता आधारित शिक्षणासाठी प्रत्येक मूल जिथे आहे तेथून त्याला अपेक्षित अध्ययन निष्पत्तीपर्यंत नेण्यासाठी कोणते उपक्रम, अध्ययन अनुभव, अध्यापनाच्या कृती, पद्धती राबवाव्या यांचा समावेश नियोजनात असतो. यासाठी काही मूल्यमापन चाचण्यांची आणि संख्यात्मक माहितीची मदत घेतली जाते. हे नियोजन शिक्षण परिषदेमध्ये केंद्रस्तरावर केले जाते. केंद्रस्तरावर केलेले नियोजन प्रत्येक शिक्षक, प्रत्येक शाळा यांच्यापर्यंत पोहोचते. शिवाय अशी अनेक केंद्रे असतील तर त्या पातळीवर सातत्याने बदल घडत पुढे संपूर्ण तालुका, जिल्हा यांच्यात बदल घडवून आणायची ताकद यामध्ये आहे. ज्या केंद्रांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबवली जाते अशा केंद्रांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने लक्षणीय सुधारणा होताना दिसत आहे.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सुधारित मार्गदर्शिका pdf download








