इयत्ता २ री, ३ री, ४ थी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत new curriculum training
विषयः इयत्ता २ री, ३ री, ४ थी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत. (STATE TOT/ राज्यस्तर TOT साठी जिल्हास्तर सुलभकांची नावे कळविणेबाबत)
संदर्भ: शासन निर्णय क्रमांक-२०२५/प्रक्र. ९४/एस.डी.४ दि.१४/०७/२०२५
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भाधिन शासन निर्णयान्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील इ. २ री, ३ री, ४ थी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे.
शैक्षणिक वर्ष दि. १५ जून २०२६ पासून सुरु होणार असलेमुळे त्यापुर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्य शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी च्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आलेले आहे.
A. प्रशिक्षणाचे माध्यम व प्रशिक्षण स्तर-
प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबत सामावून घेतले जाईल. उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हा स्तर असे दोनच स्तर असतील तर मराठीसोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात यावे.
B. प्रशिक्षण कालावधी व वेळापत्रक-
प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी दुसरीसाठी ०३ दिवसांचा आणि तिसरी व चौथीसाठी ०४ दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

C. प्रशिक्षण घटकसंच व वाचन साहित्यः
प्रशिक्षक / सुलभक यांचेसाठी मराठी माध्यमाचे प्रशिक्षण घटकसंच जिल्हा स्तरापर्यंत (जिल्हा मुख्यालयाच्या तालुका वाहतूकीसोबत) वितरित करण्यात येतील. उर्दू माध्यमाचे घटकसंच राज्यस्तर ToT वेळी वितरित करण्यात येतील. वाचन साहित्य म्हणून पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ (भाग-१ व भाग-२) यांच्या प्रती सन २०२५-२६ मध्ये शाळांना पुरविण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम इयत्ता तिसरी (भाग-१ व भाग-२) तसेच इयत्ता चौथी (भाग-१ व भाग-२) प्रत्येक शाळेसाठी एक संच तालुका स्तरापर्यंत पोच करण्यात येत आहे. त्याचे वितरण शाळा स्तरापर्यंत होईल याची दक्षता घ्यावी व प्रशिक्षणास येताना त्याची प्रत सोबत आणणेबाबत प्रशिक्षणार्थी यांना कळवावे. मराठी माध्यमातील अभ्यासक्रमाची प्रत सर्व माध्यमाच्या शाळांना पुरविण्यात येईल. अभ्यासक्रमाचा एक संच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या तालुका वाहतूकीसोबत पाठविण्यात येईल.
D. प्रशिक्षणार्थी व सुलभक-
जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET यांची राहील. माध्यमनिहाय प्रशिक्षणार्थी संख्या व तपशीलवार नियोजन सोबत जोडलेले आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार ६० प्रशिक्षणार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे आवश्यक बॅचेस तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ज्ञांची निवड करावी व अन्य पूर्वतयारी करावी.
उर्दू माध्यमांसाठी तालुकास्तरावर वर्गासाठी पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांचेसाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे दोनच टप्पे असतील. संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र दिलेले आहे. सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असेल त्या DIET मार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल.
प्रशिक्षणार्थी संख्या, उपलब्ध सुलभक संख्या यांनुसार एकापेक्षा जास्त टपप्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे. शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणी इत्यादी राष्ट्रीय कामकाज सोपविलेले असल्यास त्याचा विचार करुन प्रशिक्षणाचे एक अथवा अधिक टप्प्यांमध्ये नियोजन करावे. तथापि दिलेल्या कालमर्यादेत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
E. पर्यवेक्षण व समन्वय-
राज्यस्तर तज्ज्ञांचा जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणासाठी आवश्यकतेनुसार उपयोग करुन घेता येईल. विभागातील प्रशिक्षण परिणामकारक व नियोजनानुसार होत असलेबाबत क्षेत्रीय विद्या प्राधिकरण (RAA) व DIET यांनी समन्वय साधावा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित राहतील याबाबत आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक प्रशिक्षणासाठी निधीची उपलब्धता झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल. खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येईल त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही.
प्रशिक्षणासाठी प्रशासकीय व आर्थिक तरतूदीबाबत सूचना यथावकाश निर्गमित करण्यात यतील. त्याचप्रमाणे इ.६वी प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
F. राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ToT नियोजन
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी नवीन अभ्यासक्रम राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) साठी अपेक्षित संख्या.
राज्यस्तरावरील ToT प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या गरजेनुसार (इ.२ री साठी प्रतिवर्ग ३) व (इ. ३ री, ४ थी साठी एकत्रित प्रतिवर्ग ४) या प्रमाणात सुलभकांची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार दिलेल्या संख्येच्या मर्यादेत जिल्हास्तर TOT साठी सुलभक यांची निवड आपले स्तरावरुन करण्यात यावी व त्यांची नावे राज्यस्तर TOT साठी या कार्यालयास कळविण्यात यावीत.
राज्यस्तर (ToT) प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निर्धारित संख्येनुसार राज्यस्तर प्रशिक्षणार्थी (जिल्हास्तर सुलभक) यांची निवड करताना त्यामध्ये, उत्तम प्रशिक्षक कौशल्ये असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य, अनुभवी व्याख्याता, पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक, अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य, इ. तज्ज्ञांचा समावेश करावा. राज्यस्तरासाठी निवड करण्यात येणारे प्रशिक्षणार्थी हे जिल्हास्तर (ToT) साठी प्रशिक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी सक्षम असावेत. ही निवड करताना सर्व विषयांचे तज्ज्ञ समाविष्ट होतील याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी DIET मधील किमान एक तज्ज्ञ समन्वयक म्हणून निवड करणे अनिवार्य असेल.
राज्यस्तर ToT मराठी व उर्दू माध्यम जिल्हानिहाय अपेक्षित संख्या तपशील सोबत लिंक मध्ये संलग्न आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांची निवड करुन त्यांना पहिल्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहणेसाठी कार्यमुक्त करणेबाबत आपले स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे व ते उपस्थित राहतील याची खात्री करावी.
सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना नियमानुसार प्रवास भत्ता अदा करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांना स्वतःचा UID, PAN, बँक खाते तपशील सोबत घेऊन येणेबाबत कळवावे.
राज्यस्तर प्रशिक्षकांचे (ToT) प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा तपशील परिषदेस वरील इमेल पत्त्यावर स्वाक्षरीत आदेश आणि ती नावे यासोबतच्या Speadsheet लिंक मध्ये दिनांक. २० एप्रिल २०२६ पर्यंत अचूक देण्यात यावीत. याव्यतिरिक्त कोणासही सदर राज्यस्तर प्रशिक्षणात सहभागी होता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या निर्धारित संख्येनुसारच प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी. प्रशिक्षण तारखांबाबत संबंधितांना कळवावे.
Spreadsheet for State ToT info.









