माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) मार्च २०२६ प्रकटन ssc result declared 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) मार्च २०२६ प्रकटन ssc result declared

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४११००४

प्रकटन

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) मार्च २०२६ च्या निकालानंतर काही माध्यमांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रामध्ये टक्केवारीसमोर दर्शविण्यात आलेल्या ‘£’ या चिन्हाबाबत गैरसमज निर्माण झालेला असून, सदर चिन्ह हे “ब्रिटिश पौंड” दर्शवित असल्याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) गुणपत्रिका व प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भातील विविध बाबी स्पष्ट करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध सांकेतिक खुणांचा वापर करण्यात येत आहे. संबंधित सांकेतिक खुणांचा अर्थ विद्यार्थी, पालक, शाळा तसेच इतर संबंधित कार्यालयांना समजावा, यासाठी त्या खुणांचे स्पष्टीकरण प्रत्येक गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या मागील बाजूस मुद्रित करण्यात आलेले असते. सदर खुणांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे :

XX – ही खूण विषयात सूट दर्शविते.

AA- ही खूण विषयात अनुपस्थिती दर्शविते.

NN – ही खूण लागू न पडणारा विषय दर्शविते.

CC – ही खूण विषयाची संपादणूक रद्द केल्याचे दर्शविते.

* – ही खूण विनियमानुसार प्रथम श्रेणीसाठी आवश्यक जादा गुण एकूण गुणात दिल्याचे दर्शविते.

# ही खूण उमेदवाराला (i) गणित व विज्ञान आणि/अथवा (ii) तीन भाषा विषयांत एकत्रित लाभमिळाल्याचे दर्शविते.

£ – ‘सर्वोत्तम ५’ च्या निकषानुसार अनिवार्य ६ विषयांपैकी विद्यार्थ्यांचे ज्या ५ विषयांचे गुण सर्वाधिक आहेत, त्या ५ विषयांचे एकूण गुण (५०० पैकी) व टक्केवारी दर्शविण्यात आली आहे.

& – ही खूण मागील परीक्षेतील उत्तीर्ण विषयांचे पुढे ओढलेले गुण अधवा श्रेणी दर्शविते.

5 – ही खूण क्रीडा, एन.सी.सी., स्काऊट गाईड अथवा कला (शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला) क्षेत्रातील प्रावीण्यासाठी / सहभागासाठी दिलेले अधिकचे गुण दर्शविते.

@ – ही खूण क्रीडा, एन.सी.सी., स्काऊट गाईड अथवा कला (शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला) क्षेत्रातील / सहभागासाठी दिलेले अधिकचे गुण आणि प्रथम श्रेणीसाठी आवश्यक जादा गुण एकत्रितरीत्या दर्शविते.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: एसएससी-२०१०/ (२५/१०)/ उमाशि-२, दिनांक २५ फेब्रुवारी २०१० अन्वये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) मध्ये मार्च २०१० पासून “सर्वोत्तम ५” (Best Five) योजना लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेनुसार विद्यार्थ्यांच्या अनिवार्य ६ विषयापैकी ज्या ५ विषयांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेले असतात, त्या ५ विषयांचे एकूण गुण (५०० पैकी) व त्यानुसार टक्केवारी गुणपत्रिका व प्रमाणपत्रामध्ये स्वतंत्रपणे दर्शविण्यात येते. या नोंदीसाठीच ‘६’ या सांकेतिक चिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे.

म्हणजेच, गुणपत्रिका व प्रमाणपत्रामध्ये दर्शविण्यात आलेले ‘६’ हे चिन्ह कोणत्याही चलनाशी अथवा “ब्रिटिश पौंड” या अर्थाशी संबंधित नसून, ते केवळ “सर्वोत्तम ५” निकषानुसार टक्केवारी दर्शविणारे एक सांकेतिक चिन्ह आहे. सदर चिन्हाचा वापर हा शासन निर्णयानुसार सन २०१० पासून सातत्याने करण्यात येत असून, तो मंडळाच्या स्थापित पद्धतीचा एक भाग आहे.

तसेच, संबंधित चिन्हाचा अर्थ गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या मागील बाजूस स्पष्टपणे मुद्रित करण्यात आलेला असतानाही काही माध्यमांमध्ये अपूर्ण माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या उल्लेखामुळे अनावश्यक गैरसमज निर्माण झालेला दिसून येतो. विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये अथवा शाळांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी मंडळामार्फत हे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रिया, निकाल व प्रमाणपत्रे यामध्ये पारदर्शकता, सुसंगती व प्रशासकीय स्पष्टता राखण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, सर्व संबंधितांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणताही गैरसमज बाळगू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment