०५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रेरणादायी मराठी भाषण marathi speech on teacher’s day celebration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

०५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रेरणादायी मराठी भाषण marathi speech on teacher’s day celebration

गुरुविण न मिळे ज्ञान ज्ञानाविन न होई जगी सन्मान | जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया ||

अध्यक्ष, महाशय आणि आदरणीय गुरुजन वर्ग आणि प्रिय विदयार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर. शिक्षक दिन. शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आज तुम्हाला शिक्षकांच्याविषयी जी माहिती सांगणार आहे, ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यात आणि यशाचा मार्ग दाखविण्यात आई वडिल यांच्यानंतर त्यांचा मोलाचा वाटा असतो.

दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक होते. ते नेहमीच आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा विचार करत असत.

जर शिक्षकास सन्मान आणि पुरेसे उत्पन्न मिळत नसेल तर राष्ट्राच्या विकासाबद्दल विचार करणे निरर्थक आहे, असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी आपला वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जावा अशी इच्छा व्यक्त केली.

तेव्हापासून म्हणजेच 1962 पासून 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. भाषण, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. अनेक शाळांमध्ये मुले स्वतः शिक्षक बनून शाळा चालवतात. आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करतात.

विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात.

त्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानतात. शासन, तसेच अनेक संस्थांच्या माध्यमातून आदर्श शिक्षकांना पुरस्कार दिले जातात.

नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगती पाहतो तो शिक्षक, नेहमी ज्ञान अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडतो अन् घडवतो तो शिक्षक….

आई वडील आपल्याला जन्म देतात, पालनपोषण करतात. आयुष्यभर आपल्याला साथ देतात. पण शिक्षक आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवतात. आपल्या आयुष्याला आकार देतात. आपल्याला शिस्त लावून स्वतःबद्दल विचार करायला शिकवतात. त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाहीत.

शिक्षकांना समाजात खूप मानाचं स्थान असते. कारण मुलांना आणि पर्यायाने देशाला घडविणारे शिक्षकच असतात. शिक्षकांनी दाखवलेल्या वाटेवरच मुले मार्गक्रमण करत असतात. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू बनवतात.

खरंतर शिक्षकांच्या हातातच देशाचे भविष्य असतं. कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, शिक्षक, पोलीस आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. म्हणूनच असे म्हणतात की ज्या देशातील शिक्षक कर्तृत्ववान असतात तो देश कधीच मागे राहत नाही.

विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. उत्तम संस्कार, जीवन जगण्याची शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते. त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाहीत.

म्हणूनच फक्त 5 सप्टेंबरच नव्हे तर प्रत्येक दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान राखला पाहिजे. कारण तेच आपले भाग्यविधाते आहेत.

शेवटी इतकंच म्हणावसं वाटतं,

अनमोल ज्ञान दिले तुम्ही, योग्य मार्ग दाखवला तुम्ही जगण्याला दिशा दिली तुम्ही आयुष्याला शिस्त लावली तुम्ही…. ऋण फेडाया तुमचे, नाही शक्य या जन्मी…..

 

Related posts:

Leave a Comment