शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७ ची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत educational work management calendar
संदर्भ: १. दिनांक ०९.०५.२०२६ रोजीच्या बैठकीतील निर्देश.
२. या कार्यालयाचे पत्र क्र. प्रशिसं/८०२/कॅलेंडर/२०२६/, दिनांक १२.०५.२०२६.
३. आयुक्त (शिक्षण) पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं ८०२/कॅलेंडर/२०२५, दिनांक २०.०५.२०२५.
उपरोक्त विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की, कोणतेही शैक्षणिक अथवा प्रशासकीय काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी त्याचे पूर्व-नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळा पातळीवर विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांचे योग्य प्रकारे वर्गीकरण आणि महिनानिहाय नियोजन करून शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी ‘शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर)’ अंतिम करण्यात आले आहे. सदर शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७ ची प्रत प्रिंट स्वरुपात सर्व शाळा, समुह साधन केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय कार्यालये यांना पुरविण्यात येणार आहे.
सदर कॅलेंडर हे केवळ शाळा, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांसाठी मर्यादित नसून, ते राज्यस्तरापासून ते थेट
विभाग, जिल्हा, तालुका, बीट, केंद्र आणि शाळा पातळीवरील सर्व शिक्षक व अधिकारी यांना मार्गदर्शक ठरणार आहे.
१. उद्दिष्टे :
दैनंदिन कामकाजात व विविध उपक्रम अंमलबजावणी यामध्ये सुसूत्रता आणणेः शिक्षक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेला (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य (डायट), विभागीय शिक्षण उपसंचालक) महिनानिहाय करावयाच्या ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रमांची/कामांची पूर्वकल्पना देऊन आवश्यक नियोजन व अंमलबजावणी यामध्ये सुसूत्रता आणणे.
नियोजन, वेळेची बचत व अचूकताः पूर्व नियोजित कालबद्ध वेळापत्रकानुसार उपक्रम, नियोजन व
त्यानुसार अंमलबजावणी करणे
क्षेत्रीय समन्वयः राज्य पातळीपासून ते शाळा पातळीपर्यंतच्या सर्व घटकांमध्ये उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत एकवाक्यता निर्माण करणे.
२. स्वरुप : शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेडर) याची विभागणी ३ टप्प्यात केली आहे.
अ. दैनंदिन करावयाची कामे
आ. दरमहा करावयाची कामे
इ. महिनानिहाय आठवडानिहाय करावयाची कामे / उपक्रम
३ अंमलबजावणी / वापर :
राज्यातील विविध शाळा प्रकार- प्राथमिक (इयत्ता १ ते ४/५, इयत्ता १ ते ७/८), माध्यमिक (इयत्ता ५ते १०/१२, इयत्ता ८ ते १०/१२) इत्यादी शाळा प्रकार व शाळा व्यवस्थापन शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळा अशा शाळापैंकी सर्व शाळांनी आपल्याशी संबंधित उपक्रमांचे आवश्यक नियोजन करावे व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तर अशा विविध स्तरावरील संबंधित कार्यालये व अधिकारी यांनी आपल्याशी संबंधित उपक्रमावर विहित नियोजनानुसार आवश्यक पत्रव्यवहार, निधी वितरण, सूचना, मार्गदर्शन, आढावा इत्यादी कार्यवाही करावी
४. साध्य :
विद्यार्थी गुणवत्ता विकासः विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी वेळेत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या
अध्ययन स्तरात व गुणवत्तेत निश्चित सुधारणा साध्य होईल.
प्रभावी पर्यवेक्षणः पर्यवेक्षीय यंत्रणेला शाळा भेटी दरम्यान नेमका कोणत्या घटकांचा किंवा उपक्रमाचा आढावा घ्यायचा आहे, याचे स्पष्ट उद्दिष्ट मिळाल्याने प्रशासकीय नियंत्रण अधिक मजबूत होईल.
१००% अंमलबजावणीः सर्व शैक्षणिक आणि शासकीय योजनांची उद्दिष्टे विहित कालमर्यादेत पूर्ण होऊन कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी उपक्रमांपासून वंचित राहणार नाही.
तरी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी व शाळांनी उपरोक्त नमूद बाबींच्या अनुषंगाने शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) मधील नमूद उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी.
सोबतः शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७ प्रत.










