“संकटाचे घाव” मराठी बोधकथा marathi bodhkatha
संकटाचे घाव
अनेक समस्या आणि दुःखाने वेढलेला एक तरुण विमनस्क अवस्थेत एका गावातून जात होता. तो दुःखी होता; कारण त्याने कितीतरी संकटे झेलेली होती. त्याच्या पदरात यश काही पडतच नव्हते. गावातून जात असता त्याला तहान लागली. एका लोहाराकडे त्याने पाणी मागितले. पाणी पिऊन तो तेथे शांत बसून त्या लोहाराच्या कामाचे निरीक्षण करीत राहिला, अंगणात काम सुरू होते. भाता चालू होता. ऐरणीवर घाव पडत होते. लोहार एक तापते लोखंड ऐरणीवर घेऊन घणाने घाव घालत होता. तरुणाचे लक्ष सहज एका कोपऱ्यात गेले, तर घाव घालून घालून माथा फुटलेले अनेक हातोडे तिथे पडले होते,
त्या तरुणाने कुतूहल म्हणून सहज त्या लोहाराला विचारले, “इतके हातोड्याचे घाव घालून झिजायला किती ऐरणी लागल्या?” लोहार म्हणाला, “मित्रा हातोडे इतके लागले, पण ऐरण मात्र एकच आहे. एकच ऐरण शेकडो हातोड्यांचा घाव सहन करते. कारण हातोडे घाव घालतात, ऐरण ते सहन करत असते.” त्या तरुणाचे डोळे काहीतरी सापडल्यासारखे चमकले. म्हणजे जो हातोडारूपी संकटांचे घाव सहन करतो, तोच जिंकतो आणि आनंदाने त्याने आपला रस्ता धरला.









1 thought on ““संकटाचे घाव” मराठी बोधकथा marathi bodhkatha”