“प्रामाणिकपणा आणि विश्वास” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“प्रामाणिकपणा आणि विश्वास” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

“राजाच्या दरबारात प्रतापसिंह कोषागाराचा प्रमुख होता. एके दिवशी कोषागारातील मोहरांचा हिशोब करण्याचे राजाने ठरवले. सर्व मोजल्यानंतर एक मोहर कमी असल्याचे राजाच्या लक्षात आले. यामुळे प्रतापसिंह घाबरला. राजाने प्रतापसिंहला विचारले, “एक मोहर कमी आहे, म्हणजे तूच ती चोरली असणार!” प्रतापसिंहाने आपली खरी बाजू मांडली; पण राजाचा विश्वासच बसेना. राजाने चुकीला माफी नाही असे म्हणत त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

मंत्री, सेना व प्रजा सर्व जण घाबरले व प्रतापसिंहविषयी हळहळ व्यक्त करू लागले. दुसऱ्या दिवशी दुपारी ठीक चार वाजता मृत्युदंडाची शिक्षा ठरवली गेली. राजाने प्रतापसिंहाला विचारले, “तुझी शेवटची इच्छा काय आहे? तू खूप वर्षांपासून दूरच्या गावातून दरबारात येत आहेस, तुला मी शेवटच्या इच्छेसाठी संधी देतोय.

प्रतापसिंह म्हणाला, “महाराज, मला माझ्या गावी जाऊन माझी पत्नी आणि मुले यांना भेटायची इच्छा आहे.” राजाला वाटले, गावी गेल्यावर हा पळून गेला तर? राजा म्हणाला, “ठीक आहे, पण उदया दुपारी चार वाजता मृत्यूदंड आहे. परत येईपर्यंत तुला कोणाला तरी इथे ओलिस ठेवावे लागेल.” प्रतापसिंहाने होकार दिला, दरबारातील अनेक मित्रांना त्याने विचारले. कोणीही तयार होत नव्हते, कारण प्रतापसिंह नाही आला तर थांबणाऱ्याला मृत्यूदंड होणार होता. परंतु प्रतापसिंहाचा एक मित्र उदयसिंग तयार झाला. “हो मी थांबतो”, तो म्हणाला. सर्व जण आश्चर्यचकित झाले. तेव्हाच राजाने प्रतापसिंहाला गावी जाऊन येण्याचा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी दोन वाजले. ठरल्या वेळेत राजासह सर्व उपस्थित झाले. तीन वाजले, साडेतीन वाजले. सर्व जण प्रतापसिंहाची वाट पाहू लागले. अखेर पावणेचार वाजले तरीही प्रतापसिंह येण्याची चाहूल लागेना. मग उदयसिंहाला मृत्यूदंड देण्यासाठी उभे केले; परंतु उदयसिंहाला मित्राविषयी विश्वास होता तो नक्की परत येईल. गावी प्रतापसिंहाने घडलेली हकिकत पत्नी व मुले यांना सांगितली. पत्नी मुले हंबरडा फोडून मोठमोठ्याने रडू लागली. जर मी नाही गेलो तर माझा मित्र उदयसिंह याला फाशी दिली जाईल. पत्नी, मुले यांना बाजूला करत प्रतापसिहांने घोड्यावर टांग मारली व निघाला. इकडे सर्व तयारी झाली. शेवटची दोन मिनिटे राहिली होती. तेव्हा दुरून घोड्याच्या टापांचा आवाज आला. प्रतापसिंह मोठ्याने ओरडला, “मी आलो थांबा, थांबा!” या आवाजाने उदयसिंहाला हायसे वाटले व त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, “माझा प्रामाणिक व विश्वासू मित्र आला.” राजासह सर्व उपस्थितांना आश्चर्य वाटले.

राजाने दोघांनाही जवळ बोलावले. “एवढी प्रामाणिकता व विश्वासू असलेले सेनापती, सैनिक माझ्या दरबारात आहेत, हे माझे भाग्य आहे.” राजाने आदेश दिला, “ही मृत्युदंडाची शिक्षा मी रद्द करत आहे. प्रतापसिंह व उदयसिंह यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली व दोघेही रडू लागले. कमी भरलेली ती मोहर तिसऱ्या दिवशी कोषागारात पेटीच्या कोपऱ्यात पडलेली आढळून आली

Leave a Comment