“14 नोव्हेंबर बालदिन” भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त मराठी निबंध 14th november children’s day
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती यांची 14 नोव्हेंबरला जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरूंना मुलांबद्दल खूप प्रेम होते. ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलांसोबत हसण्या-खेळण्यात हरवून जायचे. त्यांच्यासोबत वेळ घालवताना ते स्वतःच लाहान व्हायचे. लहान मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मुलांवरील अपार प्रेम आणि आपुलकीमुळे दरवर्षी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो.
बालदिन मराठी निबंध खालील प्रमाणे
आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करत आहोत यानिमित्ताने मी आदरणीय वंदनीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार आपल्या समोर मांडत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो? मित्रांनो 14 नोव्हेंबर हा महान भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. जवाहरलाल नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते. मुलंही त्यांना चाचा नेहरू या नावाने हाक मारायची. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
पंडित नेहरू म्हणायचे- ‘आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. मुले हे या देशाचे भविष्य आहेत. म्हणूनच त्यांच्या शिक्षण आणि कल्याणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आपण मुलांची जितकी चांगली काळजी घेऊ तितकी राष्ट्र उभारणी चांगले होईल. बालदिन साजरा करण्यासाठी आयोजित केले जाणारे कार्यक्रम देशाचे भविष्य घडवण्यासाठी मुलांचे महत्त्व अधोरेखित करतात. तसेच मुले ही राष्ट्राची मौल्यवान संपत्ती, भविष्य आणि उद्याची आशा आहे. त्यामुळे त्यांचे योग्य संगोपण आणि प्रेम मिळाले पाहिजे’, असे देखील ते म्हणत भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने मुलांच्या विकासासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. मात्र आजही अनेक मुलांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक बालकाला त्याचे मूलभूत बाल हक्क मिळत नाहीत तोपर्यंत बालदिनाचा अर्थ पूर्णपणे सार्थ होऊ शकत नाही. बाल शोषण आणि बालमजुरी पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे. आर्थिक कारणांमुळे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. बालकल्याणाच्या सर्व योजनांचा लाभ मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. बालदिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून बाल हक्कांबाबत जनजागृती केली पाहिजे.










