विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ नोटिशीसंदर्भात महत्वाच्या सुचना sir notice instructions paripatrak
संदर्भ :
१) भारत निवडणूक आयोगाचे क्रमांक- ईसीआय/पीएन/१२०/२०२६,
दिनांक २६.०९.२०२६ चे प्रसिध्दी पत्रक.
२) या कार्यालयाचे समक्रमांकाचे दिनांक २८.०९.२०२६.
३) भारत निवडणूक आयोगाचे क्रमांक- २३/२०२५-ERS (Vol.-II), दिनांक २९.०९.२०२६ चे पत्र
महोदय/महोदया,
उपरोक्त संदर्भीत भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २९.०९.२०२६ च्या पत्राची प्रत माहितीसाठी सोबत जोडलेली आहे.
२. भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक २६.०९.२०२६ च्या प्रसिध्दी पत्रकामध्ये नमुद केलेले मुद्दे निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या निदर्शनास आणण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक २८.०९.२०२६ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या दि.२९.०९.२०२६ च्या पत्रान्वये दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
3. वरील पत्र तसेच या कार्यालयाने या पुर्वी वेळोवेळी दिलेल्या पत्रातील सुचना विचारात घेऊन खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१) जुळवणी न झालेल्या (No Mapping) व जुळवणीमध्ये तार्कीक विसंगती असलेल्या (Logical Discrepancies) ज्या मतदारांसाठी नोटिस तयार झालेल्या असतील त्या नोटिसामध्ये संबधित मतदाराला नोटीशीत नमूद ठिकाणी सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याच्या सुचना छापून आलेल्या आहेत. आयोगाच्या सुधारित सुचनांनुसार अशा मतदारांना सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. सबब, अशा नोटीसा संबंधित मतदारांना प्रत्यक्षात देताना, सदर नोटीशीच्या खाली “प्रत्यक्षात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही” असे संबंधित BLO मार्फत लिहुन देण्यात यावे. तसेच व्हाट्सअॅप किंवा अन्य ऑनलाईन माध्यमाद्वारे अशी नोटीस पाठविल्यास वरीलप्रमाणे संदेशही सदर नोटीसीसोबत पाठविण्यात यावा, ज्यायोगे मतदाराच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही.
२) ज्या मतदारांना अशा नोटीसा यापूर्वीच निर्गमित करण्यात आल्या असतील अशा मतदारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दुरध्वनी संदेशाद्वारे / व्हाट्सअॅप संदेशाद्वारे अन्य संवाद माध्यमाद्वारे तात्काळ संपर्क करुन सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. केवळ आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत अशा सुचना देण्यात याव्यात.
३) ज्या मतदारांना वरीलप्रमाणे नोटिसा निर्गमित केलेल्या असतील, अशा मतदारांच्या घरी संबधित मतदान केंद्र स्तरीय अधिका-याने (BLO) प्रत्यक्ष भेट द्यावी व संबधित मतदार किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन घ्यावीत. सदर कागदपत्रे तसेच/किंवा तार्किक विसंगतीबाबत बिएलओचा पंचनामा/पडताळणी अहवाल ईसीआयनेटवर बीएलओ यांनी बिएलओ अॅप द्वारे उपलब्ध करुन दिल्यानंतर सबधित मतदार नोंदणी अधिकारी / सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी निर्णय घ्यावा. अशा प्रकरणात सुनावणीसाठी मतदाराला बोलाविण्याची आवश्यकता नाही. त्या व्यतिरिक्त जे मतदार ऑनलाईन पद्धतीने/व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कागदपत्र / पुरावे सादर करतील व अशा कागदपत्राची पडताळणी करणे शक्य असेल, अशा प्रकरणी त्या आधारे निर्णय घेता येईल.
४) वरील प्रमाणे संबधित मतदाराशी संपर्क करण्यास व कागदपत्रे जमा करुन घेण्यास बिएलओ यांना राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधींचे सहकार्य घेता येईल.
४) केवळ अपवादात्मक प्रकरणात कोणत्याही उपलब्ध संवाद माध्यमातून ऑनलाईन सुनावणी घेता येईल व त्यासाठी संबधित मतदार किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या त्यांच्या कुटूंबातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीस सुनावणीस हजर रहाता येईल.
५) मतदारांच्या नोंदणीकरीता दि. ३,४,१० व १९ ऑक्टोबर, २०२६ रोजी विशेष शिबिरे (Special Camps) आयोजित करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. अशा शिबीरांमध्ये वर नमुद नमुद केलेल्या गटातील मतदार कागदपत्रे स्वतःहून सादर करत असल्यास ती स्वीकारण्यात यावीत व पुढिल कार्यवाही करण्यात यावी. ६) सहायक मतदार नोंदणी अधिकारी/ मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मते जुळवणी न झालेल्या प्रकरणी किंवा तार्कीक विसंगती असलेल्या मतदाराच्या बाबत पर्याप्त पुरावे उपलब्ध झालेले नसतील किंवा प्राप्त कागदपत्राच्या आधारे सकारात्मक निर्णय घेणे शक्य नसेल तर सदर मतदाराचे नांव मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यापुर्वी,
अ) संबधित मतदाराला आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी पुरेशी संधी देणे, सुनावणी घेणे, आवश्यक आदेश पारित करणे अनिवार्य आहे,
ब) अशा प्रकरणी पात्र मतदार मतदार यादीतील समावेशनापासून वंचित रहाणार नाही व मतदाराच्या मतदानाच्या हक्कावर बाधा येणार नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संवधित मतदार नोंदणी अधिकारी यांची राहील.
क) सबब, अशा प्रकरणी कोणताही नकारात्मक निर्णय घाई गडबडीने न घेता पुर्ण शहानिशा करुन सबधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर या बाबत निर्णय होणे आवश्यक राहील.
ड) अशा प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यापुर्वी अशा मतदारांच्या नावांची यादी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना देण्यात यावी व सबंधित मतदाराकडून कागदपत्र उपलब्ध करुन घेण्यास सहकार्य करण्यास सुचवावे. तसेच या करिता पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात यावा. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
ई) अशा प्रकरणात चुकीची कार्यवाही होणार नाही व आयोगाच्या सुचनांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
७) भारत निवडणूक आयोगाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने ECINET सॉफ्टवेयर मध्ये तसेच BLO ऍप मध्ये आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही आयोगाच्या स्तरावर सुरू असून लवकरच अशा सुधारणांबाबत आपणांस कळविण्यात येईल.
८) आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांकडुन आवश्यक कागदपत्रे / पूरावे घेणे अपेक्षित आहे. आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे याची खातरजमा संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी करावी.
९) रात्र-निवा-यात रहाणारे बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील विशेषतः PVTG गटातील व्यक्ती, अनाथ, सेक्स वर्कर्स ई. असुरक्षित गटातील मतदारांकरिता त्यांच्या सोयीनुसार विशेष शिबिरे / मदत कक्ष स्थापन करुन सर्व सहकार्य करावे. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र / पुरावे उपलब्ध नसल्यास राजकीय पक्षांचे मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी, सामाजिक संस्था, अनाथ गटातील मतदारांसाठी सबंधित अनाथ-संगोपन संस्था इत्यादिंची मदत घेण्यात यावी.
१०) मतदारांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
वरील सर्व सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात व सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.










