थोर हुतात्मे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू thor hutatme
लाहोरचा प्रचंड तुरुंग. सर्वत्र गंभीर, भयसूचक वातावरण. सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतिवीर ‘इन्किलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता.
साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जयजयकार करणारे कोण होते ते निर्भय तरुण ? ते होते भारतमातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.
– सन १९२८ साली लाहोर येथे ‘सायमन कमिशन’च्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली, त्यांत ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला. त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपतराय हे जबर जखमी झाले व त्यातच १७ नोव्हेंबर १९२८ रोजी मरण पावले. सारा देश हळहळला. या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली.
१७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला, तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या. पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या. मारला गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहायक ‘साँडर्स’ होता.
हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरू दोन वर्षांपर्यंत भूमिगत होते. भगतसिंगांसह अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात येऊन त्या सर्वांवर खुनाचा खटला भरण्यात आला. तो कित्येक दिवस चालला. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले.
दि. ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ‘इन्किलाब झिंदाबाद ! इन्किलाब झिंदाबाद !’ अशी घोषणा देत तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले. दि. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोर तुरुंगात सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी फाशी देण्यात आले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपूरजवळ (पंजाब) सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला. फिरोजपूर (पंजाब) येथे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी आहे.
सरदार भगतसिंगचा जन्म पंजाबातील बंग (सध्या हे गाव पाकिस्तानात आहे) या गावी सन १९०७ साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग व चुलते स्वर्णसिंग – दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागले असल्याने भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातून मिळाले होते. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण बंग या जन्मगावी झाले. उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो-वेदिक
महाविदयालय व नॅशनल कॉलेज येथे झाले. विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. पदवी मिळवून ते घरी परतले.
भगतसिंग
कानपूरला जाऊन ‘प्रताप’ वृत्तपत्रात त्यांनी बलवंतसिंग या नावाने क्रांतिकारी लेखन व कार्यही सुरू केले. पोलिसांना त्यांच्या गुप्त हालचालींचा सुगावा लागताच कानपूर सोडून भगतसिंगांनी दिल्ली गाठली. लाहोरप्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झालेले होते. दिल्लीच्या ‘अर्जुन’ साप्ताहिकात बलवंतसिंग याच नावाने ते काम करू लागले. तिथेही पोलिसांची पाळत वाढली, तेव्हा ते लाहोरला आले व मुंडण करून भगतसिंग या नावाने वावरू लागले.
शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती येथे गेले. तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली. पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले. न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाले.
त्याच वेळी इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी व उर्दू याही भाषा त्यांनी चांगल्या अवगत केल्या. काही काळ ते ‘काँग्रेस सेवादला’त देखील होते. मात्र बनारसच्या त्या वास्तव्यात चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ संन्याल आदी क्रांतिनेत्यांशी त्यांची ओळख झाली व त्यांच्या ‘हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी’ मध्ये दाखल होऊन राजगुरूंनी ‘रघुनाथ’ या टोपणनावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्याच सुमारास त्यांची भगतसिंग, जतिनदास, सुखदेव आदी पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली. राजगुरू
सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर. आईचे नाव शल्लीदेवी असे होते. सुखदेव यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी लुधियानातील चौराबाजार येथे झाला. या ठिकाणाला ‘नऊघर’ असेही म्हणतात. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. त्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.
सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली. ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. : भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणे, हे त्यांचे ध्येय होते. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विदयार्थीही होते.
लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी भारताचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले – स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे; तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे; जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे. या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला.
१९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैदयांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले. सुखदेव यांना लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचे सुचवण्यात आले; पण त्यांनी ते बाणेदारपणे नाकारले. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेस सुखदेव यांचे नाव देण्यात आले आहे.
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला. सन १९६८ मध्ये भारत सरकारतर्फे तेथे भगतसिंगांचे भव्य स्मारक उभारले गेले. त्या वेळी भगतसिंग यांच्या वृद्ध माता विद्यावती उपस्थित होत्या.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ ‘खेड’ या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर ‘राजगुरूनगर’
असे करण्यात आले आहे. जन्मस्थळी त्यांचे स्मारकही आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारक हुतात्म्यांचे नाव स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले.










