शालेय मराठी बोधकथा संग्रह – २ marathi bodhkatha sangrah -२ moral stories 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय मराठी बोधकथा संग्रह – २ marathi bodhkatha sangrah -२ moral stories 

लोभी कुत्रा

एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागलेली होती. तेव्हा त्याला रस्त्याने चालताना एक पोळी सापडते. त्याला एकटयालाच ती पोळी खायची होती त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवून आपल्या तोंडात पोळी धरून तो धावू लागला. धावता धावता तो एका पुलावर येऊन थांबला. पुलाखाली खूप पाणी होते. कुत्र्याने पाण्यात बघितले तर त्याला पाण्यात आणखी एक कुत्रा दिसला व त्याच्याही तोंडात पोळी होती. त्याला असे वाटले की, पाण्यातील त्या कुत्र्याच्या तोंडातील पोळी आपण हिसकावून घ्यावी. यामुळे तो तोंड उघडून पाण्यातील त्या कुत्र्यावर भुंकू लागला. भुंकण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील पोळी पाण्यात पडली व त्याला उपाशी रहावे लागले.

तात्पर्य – कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये आहे त्यामध्ये समाधान मानावे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपत्तीचा उपयोग

एका कंजूष मनुष्याने आपल्याजवळील सर्व संपत्ती हे विकून आलेल्या पैशाची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहात असे व समाधान मानीत असे. एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला त्याचे गुपित समजले व त्याने गुपचूप ती सोन्याची लगड लांबविली व खड्डा पूर्ववत करून ठेवला. दुसऱ्या दिवशी कंजूष मनुष्य त्या जागी गेला व खड्डा उकरून काढला. रिकामा खड्डा पाहून तो जोराने ओरडू लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या मनुष्याने रडण्याचे कारण विचारले. सर्व हकीकत समजल्यावर तो समजल्य म्हणाला, “बाबारे, तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही. तुझ्याजवळ असलेल्या सोन्याचा तू वापर करीत नव्हतास. त्यामुळे त्याजागी एखादा दगड पुरून ठेव व त्या दगडाला सौने मानून रोज पाहात जा.

तात्पर्य : मनुष्य आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा, वस्तूचा उपभोग घेत नसेल, तर अशा वस्तू असूनही त्या नसल्यासारख्याच असतात. उपभोग घेतली नाही तर त्या वस्तूच्या मालकीचा उपयोग काय ?

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपत्तीचा खरा उपयोग

पं. मदनमोहन मालवीय बनारस हिंदू युनिव्हर्सिटीसाठी देणग्या गोळा करीत होते. एकदा लक्ष्मीनारायण नावाच्या कोट्यधीशाकडे गेले. शेटजी पूजा करीत होते. वाट पहात बसले. शेटजींचा ४/५ वर्षांचा मुलगा काडीपेटीशी खेळत होता. एक काडी काढे, मोडून टाके आणि फेकून देई. इतक्यात शेटजी बाहेर आले. त्यांनी ते पाहिले. मुलाला जोरदार फटके मिळाले. पंडितजींनी युनिव्हर्सिटीचे कार्य, प्रगती, योजना इ. माहिती सांगितली. शेटजींनी त्यांना लगेचच पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. पंडितजींना नवल वाटले. त्यांनी विचारले, “एका काडीच्या पेटीबद्दल आपण मुलाला शिक्षा केली आणि मला एवढी मोठी देणगी दिली. हे कसे काय?” शेटजी म्हणाले, पेटीतल्या काड्या मोडून त्याने काय मिळवले ? त्याने लहान असली तरी संपत्तीचा नाश केला. आपण मात्र युनिव्हर्सिटी चालवून शिक्षणाचे महान कार्य करीत आहात. तुमच्या या कामाला मदत केलीच पाहिजें. हाच संपत्तीचा खरा उपयोग.

तात्पर्य:- आपल्याकडे आसलेल्या संपत्तीचा नेहमी सदपयोग केला पाहिजे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ससा आणि त्याचे मित्र

एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला बाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला,” तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससा पण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली. ससा गाईला म्हणाला, “तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव.” गाय म्हणाली, “आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे.” तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला,” तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव घोडा म्हणाला, “मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही. मी तुला कसे पाठीवर घेवू?” तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला, “मित्रा तू तरी मला मदत कर” गाढव म्हणाले” मी तर आता घरी चाललो तू बघ मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला, “बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?” बकरी म्हणाली, “अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ” एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला, कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला, “असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे !!”

तात्पर्य :- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात मोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मनोबल

एका राजाचा एक लाडका हत्ती होता. हत्ती तरुण होता तेव्हा त्याच्यावर बसून राजाने अनेक युद्धे खेळली आणि जिंकलीही. पण हत्ती वृद्ध झाला तशी राजाने त्याला मोहिमांवर नेणे बंद केले. मात्र, त्याची देखभाल अतिशय काळजीने केली जात असे. एकदा हा हत्ती सरोवरात डुंबायला गेला असताना चिखलात अडकून बसला. त्याला बाहेर येता येईना. तो जोरजोरात ओरडू लागला. राजाचे सगळे माहूत त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले. त्याला दोरीने ओढू लागले, भाल्याने टोचू लागले. हत्ती या उपायांनी हैराण झाला, तो निराश झाला. ही बातमी राजापर्यंत पोचली तेव्हा राजाने हत्तीच्या जुन्या माहुताला बोलावणे पाठवले. तो माहूत आला. त्याने परिस्थिती पाहिली आणि राजाला सांगितले, महाराज, ताबडतोब युद्धाचे नगारे वाजवा, सैन्याला गोळा व्हायला सांगा, आक्रमणाच्या घोषणा द्यायला सांगा. राजाने तसे आदेश दिले. बघता बघता नगारे वाजू लागले, सैन्य गोळा झाले. हे सर्व पाहून हत्तीच्या अंगातही वीरश्री संचारली आणि तो एका झटक्यात चिखलातून बाहेर पडला.

तात्पर्य : निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचाराने प्रगती होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अति तेथे माती

एका गावात एक भिकारी रहात होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते माग’ भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला ‘मोहरा कशात घेणार?’ भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला ‘मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल. पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमीनीवर पडली तर त्याची माती होईल.’ भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भरत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते. त्याचबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच रहातो.

तात्पर्य – कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रत्युत्तर

एकदा एक सिंह जंगलातून रूबाबात चालला होता, त्याचा हा रूबाब पाहून एका गाढवाने त्याला मोठमोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. खूप काळ सिंहाच्या बरोबरीने चालत असताना गाढव त्याला शिव्या देतच राहिले पण सिंहाने हूं की चूं सुद्धा केले नाही की त्याच्याकडे साधे वळून पाहिलेसुद्धा नाही. तो आपल्या चालीने पुढे चालतच राहिला. सिंहाला असे निर्दावलेपणे चालत असलेला पाहून गाढव त्याला म्हणाले, “मी तुला इतक्या शिव्या दिल्या तरी तू त्याची साधी दखलसुद्धा का घेतली नाहीस?” सिंह म्हणाला,” ज्याला आपले उद्दिष्ट ठराविक काळात वाटचाल असते ते तुझ्यासारख्या गाढवाच्या शिव्यांकडे लक्ष देत बसत नाहीत.”

तात्पर्य : ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करताना अडचणी, संकटे येतील पण त्याकडे दुर्लक्ष करणे हाच खरा शहाणपणा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नदी, झाड, आणि वारा

नदीच्या काठावर मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आल्यामुळे पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक छोटे झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, ‘अरे, या वाऱ्याने माझ्‌यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वाऱ्याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?’ त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, ‘अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वाऱ्यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.’

तात्पर्य : – समर्थापुढे दुर्बलाने नम्रतेने मागावे, कसे न करता जे उद्दामपने लागतात ते ब-याचवेळा स्वताःचा नाश करुन घेतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शेतकरी व बैल

एका शेतकऱ्याचा बैल त्याच्या शेतातून हरवला म्हणून त्याने आपल्या नोकराला त्याला शोधायला पाठविले. त्या मूर्ख नोकराने त्याचा पाठलाग करत शेवटी त्याला एका अरण्यात गाठले. वाटेत रस्त्यावरून तीन पक्षी उडत गेले. त्यांच्यामागून तो नोकरही धावत गेला. त्याला तिकडे इतका वेळ लागला की मालकाला त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले. मग तो स्वतः शेतात जाऊन पाहतो तो नोकर आकाशाकडे पाहात सारखा धावत सुटला आहे असे त्याला दिसले. म्हणून त्याला शेतकऱ्याने विचारले, ‘काय रे, काय बातमी आहे?’ नोकर म्हणाला, ‘अहो, ते मिळाले का !’ शेतकरी म्हणाला, ‘अरे कोण?’ तो मूर्ख नोकर म्हणाला, ‘पहा हे तीन पक्षी येथे उडताहेत, पण मला काही ते पकडता येईनात.’ ते ऐकून शेतकऱ्याने त्याला चांगलाच मार दिला. आपले नेमून दिलेले काम सोडून भलत्या गोष्टीच्या नादी न लागण्याचे त्याला बजावले.

तात्पर्य : – बरेच लोक क्षुल्लक गोष्टीच्या मागे लागून आपले कर्तव्य बजाविण्याचे सोडून देतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖

धनगर आणि लांडग्याचे पिलू

एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले. धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते. परंतु, ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच एखाद्या चुकार मेंढराला बाजूला नेऊन, मारून खात असे. बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्यास झाडाला टांगून मारून टाकले.

तात्पर्य – प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गर्विष्ठ मेणबत्ती

एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, “ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात. तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, ‘अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढ्याशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?’

तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोकिळा, कावळा आणि घुबड

कोकीळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, ‘घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्यांची रीत झाली?’ घुबड म्हणाले, ‘अगं कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस त्याअर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.

तात्पर्य-दुसऱ्याला उपदेश करून पांडित्य दाखविण्यापेक्षा प्रथम आपली वागणूक सुधारावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आत शिरणारी पावले जंगलचा राजा सिंह म्हातारपणामुळे अशक्त आणि दुबळा झाला होता. त्याला शिकारही धड करता येत नव्हती. त्याला दोनवेळा धड खायलाही मिळायची पंचाईत झाली. तेव्हा त्याने जंगलात एक बातमी पसरवली की, आपण खूप आजारी आहोत. आपल्या राजाचे काहीच दिवस राहिले आहेत, अशा समजुतीने जंगलातले प्राणी त्याच्या समाचाराला येऊ लागले. सिंह एखादा प्राणी तब्येतीची विचारपूस करायला आला रे आला की, त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाकी. जंगलातील एक कोल्हा मात्र बरेच दिवस सिंहाच्या समाचाराला आला नव्हता. एके दिवशी तो आला. गुहेच्या बाहेर जरा लांब उभे राहून त्याने विचारले, कशी आहे महाराजांची तब्येत? सिंह आतून विव्हळत म्हणाला, अजून ठिक नाही. तू आत का येत नाहीस? आत ये. माझ्याशी जरा गप्पा मार. कोल्हा म्हणाला, मी नक्कीच आलो असतो. पण इथे फक्त गुहेत शिरणाऱ्या पावलांच्या खुणा दिसताहेत, बाहेर पडणारी पावले इथं दिसतच नाहीत.

तात्पर्य : शहाणा माणूस योग्य वेळीच संकटाची चाहूल ओळखून सावधगिरीने वागतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महान रसायन शास्रज्ञ नागार्जुन

प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं* या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यानी विचारले. कामात काही अडचणी आल्या तर नाही ना? पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता. वडील पोटदुखीनं हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता; पण माझी साधना मी सोडली नाही. व हे रसायन तयार करून आणलं आहे. “दुसरा म्हणाला, “आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धन होता. बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. त्यामुळे आपण दिलेलं काम मी पूर्ण करु शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसांची सवड द्यावी. आचार्यांनी आपल्या सहाय्यक म्हणून त्याचीच निवड केली.

तात्पर्यः ज्ञान असून ते जर योग्य वेळेला उपयोगात नाही आणले तर त्याचा काय उपयोग. समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हरीण आणि कोल्हा एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, ‘आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.’ हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, ‘अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.’

तात्पर्य :- दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ससा आणि त्याचे मित्र

एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला,” तुम्ही चौघे जसे मित्र आहात तमेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससा पण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली. ससा गाईला म्हणाला, “तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव.” गाय म्हणाली, “आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे.” तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला,” तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव घोडा म्हणाला, “मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही. मी तुला कसे पाठीवर घेवू?” तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला, “मित्रा तू तरी मला मदत कर” गाढव म्हणाले” मी तर आता घरी चाललो तू बघ मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला, “बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?” बकरी म्हणाली, “अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ” एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला, “असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!”

तात्पर्य :- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात मोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कुरापती ऊंदीर

एका ठिकाणी एक मोठा हत्ती शांतपणे बसलेला असतो, तेवढ्यात एक कुरापती ऊंदराला हत्तीला चिडवायची हुक्की येते, तो आपल्या बिळातुन येऊन तो हत्तीला त्रास देवू लागतो, सुरवातीला हत्ती दुर्लक्ष करतो, पण नंतर ऊंदराला मजा येवू लागते, हत्तीला त्रास देण्यात, हत्ती जागेवरुन ऊठतो आणी ऊंदराला मारण्या साठी त्याच्या बिळाच्या दिशेने आपल्या डोक्याने टक्कर मारू लागतो, ऊंदीर आत असल्याने ऊंदराला काहीच फरक पडत नाही, तो परत दुसरी कडुन त्रास देत राहतो, कारण ऊंदराला पक्क माहीत होतं की हा हत्ती प्रचंड ताकदवर आहे, तसाच त्याचा टराग ही प्रचंड आहे, पण तरीही तो आपणास हरवु शकत नाही, कारण त्याचा राग आणि अतिऊत्साहीपणाच त्याला नडेल, जितका ऊंदीर त्रास देऊ लागला, तितका हत्तीचा राग अजुन वाढु लागला, आणि आपण कुणाशी भांडतो कशासाठी भांडतोय, हे हत्तीच्या लक्षात आले नाही, शिवाय ऊंदराचे तर कामच आहे कुरापतीं करणे, आपण तिकडे लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण ऊंदराला हरवु शकतो हेही हत्ती विसरला, ऊंदीर आपल्याला आपल्या ऊद्देशापासुन लांब नेतोय हे पण हत्तीच्या ध्यानातच येत नसते, आणि शेवटी इतक्या मोठ्या बलाढ्य हत्तीने, ऊंदराच्या फालतु गोष्टीमुळे, आपले डोके आपटुन आपटून आपला जीव गमावला. आता यात ऊंदराचे काही नुकसान झाले का ? नाही, उलटे ऊंदराने चांगले स्वतःचे मनोरंजन करून घेतले, वरून एका बलाढ्य हत्तीला हरविण्याचे श्रेय आणि आनंद मिळवला. हत्तीला त्याच्या ताकदीच्या गर्वाने टझुकवलं आणी बुद्धीने काम करणं थांबवलं. जर वेळीच त्याने विचार केला असता, आणि त्याप्रमाणे वागला असता, तर असं कोणीही त्याची ताकद आणी रागाचा गैरफायदा घेतला नसता.

तात्पर्य – शांत राहा आणि चांगला निर्णय घ्या, आपल्या जीवनात विजयी व्हा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कासव आणि बेडूक

नदीकाठी गवतात काही बेडूक खेळून उड्या मारून स्वताःची करमणूक करत होते. ते पाहून तेथील कासवाला आपल्याला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाचले. इतक्यात त्या बेडकाना नाचताना पाहून एक घार आकाशातून उत्तरली व तिने सर्व बेडूक खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले, ‘अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी.’

तात्पर्य- देवाने जे गुण जन्मःताच दिलेले असतात. तेच हितकारक असतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माणुस व उंदीर

लोकांचे धान्य दळून देणाऱ्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, ‘बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.’ लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,’ ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, ‘अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे, कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,’ हे ऐकून उंदीर म्हणाला, ‘बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.’ तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, ‘प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.’ व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले.

तात्पर्य : – ज्या व्यंगाबद्दल आपण दुसऱ्यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

सोन्याची अंडे देणारी कोंबडी

एका गावात एक खूप गरीब शेतकरी रहात असतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक कोंबडी विकत घेतो. जेणेकरून कोंबडी पासून मिळणारे अंडे विकून तो त्यापासून पैसे मिळवू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आणलेल्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ते सोन्याचे अंडे बघून शेतकरी आश्चर्यचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले त्या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याने परत ते अंडे बाजारात विकले. अशा प्रकारे ती कोंबडी रोजच एक सोन्याचे अंडे देऊ लागली व तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली व तो चांगले व आनंदी जीवन जगू लागला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बढाईखोर माणुस

एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.

तात्पर्य  : – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖

हरिण व कोल्हा

एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, ‘आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे. हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, ‘अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.’

तात्पर्य: दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तरुण माणूस

एक तरुण माणूस फार छांदिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही; असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली, तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, ‘अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.

तात्पर्य – व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान राहत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भला माणूस

एका श्रीमंत व्यक्तीने एक मंदिर बांधले. मंदिरात ईश्वराची पूजा करण्यासाठी एक पुजारी नेमला. मंदिराचा खर्च चालावा म्हणून खूपसारी जमीन, शेती आणि बाग मंदिराच्या नावे केली. मंदिरात जे भुकेले, दीन-दुःखी आणि साधुसंत येतील, ते तेथे दोन-चार दिवस राहू शकतील, त्यांच्या भोजनासाठी भगवंताचा प्रसाद मंदिरातून मिळेल; अशी व्यवस्था त्यांनी केली होती. आता त्यांना एका अशा माणसाची आवश्यकता होती जो मंदिराच्या निधीची व्यवस्था करेल आणि मंदिराचे सर्व कामकाज व्यवस्थित चालवेल. खूप इच्छुक लोक त्या श्रीमंत व्यक्तीकडे आले. ज्याला या मंदिराच्या व्यवस्थेचे काम मिळेल त्याला पगार चांगला मिळेल, हे ते जाणत होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने सर्वांना परत पाठवले. तो सर्वांना म्हणत असे “मला एक भला माणूस पाहिजे, मी स्वतःच त्याची निवड करेन.” खूप लोकांनी मनातल्या मनात त्या श्रीमंत व्यक्तीला शिव्या दिल्या. खूप लोक त्याला मूर्ख किंवा वेडा म्हणत होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. जेव्हा मंदिराचे द्वार उघडत असे, लोक ईश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागत तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती आपल्या घराच्या छतावर बसून मंदिरात येणाऱ्या लोकांचे शांतपणे निरीक्षण करत होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गाढवाचा गैरसमज

एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तीना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तीना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वतःला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका हाणत पाथरवटा मनाला प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तीना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.’

तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येतेच.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शेतकरी व साप

एका शेतकऱ्याने थंडीचे दिवस असताना कुंपणाजवळ पडलेला एक साप पाहिला. तो थंडीमुळे अगदी मरायला टेकला होता. ते पाहून शेतकऱ्याला त्याची दया आली. म्हणून त्याने त्या सापाला घरी नेऊन विस्तवाजवळ ठेवले. तेथे थोडी ऊब मिळताच सापाला हुशारी आली व तो मोठमोठ्याने फूत्कार करून शेतकऱ्याच्या बायकापोरांच्या अंगावर उड्या मारू लागला. त्या वेळी शेतकऱ्याची बायकापोरे जोराने ओरडू लागली. तो ओरडा ऐकून शेतकरी हातात कुऱ्हाड घेउन आला व एकाच घावात त्याने सापाचे दोन तुकडे केले. त्यावेळी तो सापाला म्हणाला, ‘अरे दुष्टा ज्याने तुझा प्राण वाचवला त्याचे उपकार असे फेडतोस काय ? ह्या तुझ्या कृतघ्नपणाला मरणापेक्षा काहीतरी कडक शिक्षा असायला हवी होती.’

तात्पर्य : – कित्येकजण स्वभावतः इतके दुष्ट असतात की, ज्यांच्या कृपेने त्यांना श्रीमंती व शक्ती प्राप्त होते त्यांच्याच जीवावर उठून वेळ पडल्यास त्यांचा नाश करण्यासही ते कमी करीत नाहीत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदाचाराचे महत्व

महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार’ ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’ राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.

तात्पर्य:- मुलांनो, सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हत्तीची सभा

आपल्या समाजाच्या हिताविषयी  नेहमी झटणाऱ्या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबुतर, विश्वासू कुत्रा, आज्ञाधारक उंट, निरुपद्रवी मेंढी व लहानशी उद्योगी मुंगी यांनी ते भाषण लक्षपूर्वक ऐकले. नेहमी कामात असलेल्या मधमाशीलादेखील ते भाषण आवडले, पण श्रोत्यांपैकी दुसऱ्या काहीजणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मुळीच आवडले नाही. उदा. वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला. साप आपल्या सर्व शक्तीनिशी फुसफुसू लागला व गांधील माशी व साधी माशी यांनी फार कुरकूर केली. टोळ तुच्छतेने सभेतून टुणटूण उडत निघून गेला. आळशी अजगराला राग आला व उद्धट वानराने तर तुच्छतेने वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली. हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खालील शब्दात संपवला, ‘माझा उपदेश सर्वांना सारखाच उद्देशून आहे. पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग आला ते आपला अपराध कबूल करताहेत. निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकताहेत.’

तात्पर्य : – आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला फारसे आवडत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रेमळ शब्द

एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, “अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत असता, तू असा पळून का जातोस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो’ यावर तो कोंबडा म्हणाला, “अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले असल्याने, त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.’

तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्याच्या मनात प्रेम असतेच असे नाही. बऱ्याच वेळा कपटही असते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली. नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली. मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’

तात्पर्य :- एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

एक डोळा अंध असलेले हरिण

एका हरिणाचा एक डोळा फुटला म्हणून ते नेहमी समुद्राकाठी चरत असे. समुद्राच्या बाजूने आपणास भिती नाही तेव्हा फुटका डोळा समुद्राकडे व धडका जमिनीकडे केला म्हणजे जमिनीवरून येणाऱ्या शत्रूपासून आपला बचाव करता येईल असे त्याला वाटे. त्या हरणाची शिकार करण्यास एक शिकारी फार दिवस टपला होता. पण जमिनीच्या बाजूने त्याचा काही उपाय चालेना. मग तो होडीत बसून समुद्रातून हरणाजवळ आला व त्यावर गोळी झाडून त्याने त्याचा प्राण घेतला. प्राण जातेवेळी हरिण मनाशीच म्हणाले, ‘अरे, काय हे दुर्दैव ! तुझी करणी विचित्र व अगम्य आहे. जिकडून मला धोका पोहचण्याची शक्यता होती तिकडून तो न पोचता मला सुरक्षित वाटणाऱ्या बाजूनेच तो पोचला. खरच हा दैवयोग विचित्र आहे.’

तात्पर्य : – आपण ज्याला मोठे विश्वासू समजतो, तेच प्रसंगी आपला नाश करण्यास प्रवृत्त होतात व जे आपणाला अविश्वासू वाटतात तेच प्रसंगी आपल्या उपयोगी पडतात, असे कधी कधी घडते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वस्तूची उपयुक्तता

एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठ्या चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, ‘अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.’ त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, ‘अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचाऱ्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.

तात्पर्य :- वस्तू लहान असो अथवा मोठी कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठ्या आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कबुतर आणि मुंगी

एका मुंगीला फार तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी एका ओढ्यावर गेला असता पाण्यात पडून वाहू लागला. ती त्याची स्थिती एका कबुतराने पाहिली, तेव्हा त्याची दया येऊन त्याने आपल्या चोचीने एक झाडाचे पान तोडून ते पाण्यात टाकले व त्याच्या आधाराने मुंगी सुरक्षितपणे कडेला आला. पुढे काही दिवस गेल्यावर एके दिवशी कबुतराला पकडण्यासाठी एक पारधी जाळे घालू लागला. त्यावेळी मुंगी जवळच होता. तो प्रकार पाहताच हळूच जाऊन त्याने पारध्याच्या पायाचा चावा घेतला. त्या वेदनेने त्याने एकदम हातपाय झाडले, त्याचा आवाज ऐकून कबुतर सावध झाले आणि उडून गेले.

तात्पर्य:-माणसाने उपकार करीत असावे म्हणजे प्रसंगी एखादा क्षुल्लक माणूसही ते उपकार स्मरून उपकारकर्त्यास मोठ्या संकटातून सोडवील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दोन कोल्हे

एकदा दोन कोल्ह्यांनी कोंबड्याच्या खुराड्यात शिरण्याची एक युक्ती योजली व ती लगेच अंमलात आणली. खुराड्यात प्रवेश होताच कोंबड्या व त्यांची पिले यांना मारून खाण्याचा त्यांनी सपाटा चालविला. त्या कोह्यांपैकी एक कोल्हा तरुण व अविचारी होता. त्याचे मत असे झाले, की सगळ्या कोंबड्या लगेच मारून खाव्यात. दुसरा म्हातारा कोल्हा अनुभवी असल्याने त्याने असे ठरविले, की काही कोंबड्या दुसऱ्या दिवसाकरता राखून ठेवाव्यात. तो तरुण कोल्ह्यास म्हणाला, मुला, मी अनुभवाने शहाणा झालो आहे अन् या जगात कितीतरी अकल्पित गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत. तेव्हा आजच हा खाण्याचा साठा न संपवता त्याचा काही भाग शिल्लक ठेवावा हे चांगलं.’ त्यावर तरुण कोल्हा म्हणाला, “तू म्हणतोस ते खरे तर माझा असा निश्चय आहे की मला आठ दिवसांचं खाणं आजच एकदम खाऊन टाकावं कारण या कोंबड्याचा मालक आता पहारा करत बसेल. अन् आम्हाला पकडून आमचा जीव घेईल. तर अशा वेळी पुनः येथे येण्याच्या भानगडीत पडणं वेडेपणाचं नाही काय?’ आपले मत सांगून तो त्याप्रमाने वागू लागला. तरुण कोल्ह्याने इतक्या कोंबड्या खाल्ल्या, की त्याचे पोट फुगून फुटले व तो मरण पावला. म्हाताऱ्या कोह्याने एकदोन कोंबड्या खाऊन दुसऱ्या दिवशी पुनः येण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी आला असता कोंबड्यांच्या मालकाने त्याला पकडले व ठार केले.

तात्पर्य : तरुण लोक अधाशीपणामुळे तर म्हातारे लोक लोभामुळे दुःख भोगतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अति तेथे माती

एका गावात एक भिकारी रहात होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते माग भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला ‘मोहरा कशात घेणार? भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला ‘मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल. पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमीनीवर पडली तर त्याची माती होईल.’ भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भरत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते. त्याचबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच रहातो.

तात्पर्य – कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सिंह आणि पशु

जंगलचा राजा सिंह व इतर पशू यांची एकत्र अशी एके दिवशी एक सभा भरली. या सभेत सिंह व इतर पशू यात एक करार झाला. सर्वांना एक विचाराने चालावे व जे काही मिळेल ते सारखे वाटून घ्यावे असे ठरले. एके दिवशी सिंह, कोल्हा, लांडगा व तरस या चौघांनी मिळून एक हरिण मारले व त्याचे कोल्ह्याने चार सारखे वाटे केले. त्यावेळी सिंह पुढे होऊन त्यातील एका वाट्याकडे बोट दाखवून म्हणाला, ‘अरे, हा माझा वाटा मी कर म्हणून घेणार, दुसराही वाटा माझाच, कारण तुम्ही जो पराक्रम केलात तो सर्व माझ्या बळावरच नाही का ?’ मग तिसऱ्या भागाकडे पाहून व मान हलवून सिंह पुढे म्हणाला, ‘ज्या अर्थी तुम्ही माझी प्रजा व मी तुमची राजा आहे, त्या अर्थी तुम्ही हा वाटा मला भक्तीने अर्पण करालच म्हणजे तोही माझाच व चौथा तर माझाच वाटा. ‘पुढे आपले प्रजेविषयीचे प्रेम व्यक्त करीत व राजेपण दाखविण्यासाठी सिंह म्हणाला, ‘परंतु हा चौथा वाटा मी जतन करून ठेवणार आहे कारण सैन्यासाठी अन्नसामग्री अशी नाही व ती असणं आवश्यक आहे. अडचणीच्या वेळी ती उपयोगी पडेल. पुढे येणाऱ्या अडचणीची आधी सोय करणं ही राजनीतीला धरून आहे, नाही का ? मी काय म्हणतो ते समजलं असेलच अन् ते जर तुम्हाला मान्य असेलच अन् ते जर तुम्हाला मान्य नसेल तर त्यात तुमचाच नाश आहे.’

तात्पर्य :- दुर्बल व शक्तिमान यांची एकी फार दिवस टिकणे शक्य नाही. कारण एकत्र येताना बलवान लोक ज्या शपथा घेतात त्या शक्तीच्या जोरावर मोडूसुद्धा शकतात. अशा वेळी दुर्बलांनी त्यांच्याशी संबंध ठेवणेच वेडेपणाचे होय.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

रानटी व गावठी हंस

एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे. त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले. एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले. ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.

तात्पर्य  : – जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कस्तुरी मृग

एकदा एका कस्तुरी मृगाची शिकार करण्याकरिता काही शिकारी लोक व त्यांचे कुत्रे यांनी त्याचा पाठलाग केला असता ते हरिण पळता पळता दमले व जीव आता कसा काय वाचवावा याच्या काळजीत पडले. तेवढ्यात त्याला सुचले की, हे शिकारी लोक आपल्याजवळ कस्तुरीसाठी मागे लागले आहेत. तेव्हा कस्तुरी जर आपण काढून टाकली तर ते शिकारी आपल्यामागे लागणार नाहीत. म्हणून त्याने आपल्याजवळील कस्तुरी टाकून दिली व ती घेऊन त्याच्या जीवास अपाय न करता ते शिकारी तेथून निघून गेले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कुत्र्याची दुर्दृष्टी

एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. ‘माणूस किती कृतघ्न असतो? स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले’ असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला.

तात्पर्यः अडचणीत सापडलेला मनूष्य स्वतःची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोपटाची विद्या

एका गावात चार ब्राह्मणपुत्र होते. त्यांची मोठी मैत्री होती. एकदा त्यांनी विचार केला. या गावात राहण्यात काही फायदा नाही. आपण दुसऱ्या देशाला जाऊन काहीतरी विद्या मिळविली पाहिजे. काही पाठांतर केले पाहिजे. मग विद्येच्या बळावर आपल्याला मान सन्मान, पैसा मिळेल. असा विचार करून ते चौघे प्रवासाला निघाले. एका गावातील पाठशाळेत जाऊन त्यांनी विद्याभ्यास सुरू केला. अनेक मंत्र पाठ केले. अध्ययन संपल्यावर ते आपल्या गावाकडे निघाले. वाटेत त्यांना मेलेल्या प्राण्याचा सांगाडा दिसला. तो पाहताच पहिला पंडित म्हणाला, “मी माझ्या जवळच्या मंत्र सामर्थ्याने या सांगाड्यात रक्त आणि मांस भरतो.’ असे बोलन त्याने त्या सांगाड्यात रक्त- मांस भरले मग दुसरा पंडित म्हणाला एक मांस भरलेल्या सांगाड्यावर कातडी चढवण्याची विद्या मला येते असे सांगून त्याने त्या सांगाड्यवर कातडे चढवले. मग तिसरा पंडित म्हणाला मी अशा प्राण्यात इतर अवयव भरण्यास शिकलो आहे. असे बोलून त्याने त्या सांगाड्यात इतर सर्व अवयव भरले. त्याच क्षणी भयंकर अशा सिंहाचे शरीर उभे राहिले. मग चौथा पंडित म्हणाला, “मला या निर्जीव प्राण्यात प्राण निर्माण करण्याची विद्या येते.’ असे सांगून त्याने प्राणमंत्र म्हणताच, सिंह जिवंत झाला. त्याने एकाच फटक्यात त्या चौघा मूर्ख पंडितांना ठार मारले.

तात्पर्य : नुसते पोपटपंची ज्ञान घातक ठरते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा 
   
   
   
   
   
   

4 thoughts on “शालेय मराठी बोधकथा संग्रह – २ marathi bodhkatha sangrah -२ moral stories ”

Leave a Comment